मुंबई : अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार, विनोदवीर अशी बहुआयामी प्रतिभा आणि प्रतिमा असलेल्या सतीश कौशिक यांचे बुधवारी दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव गुरुवारी सायंकाळी अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. रात्री वर्सोवा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सतीश कौशिक बुधवारी मित्रांबरोबर होळी साजरी करण्यासाठी दिल्लीला गेले होते. रात्री छातीत दुखू लागल्याने त्यांना ताबडतोब फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले, असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. तरीही त्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण न समजल्याने त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार्टर विमानाने पार्थिव मुंबईत आणण्यात आले. अनुपम खेर, अनिल कपूर आणि सतीश कौशिक हे तिघेही जिगरी मित्र म्हणून ओळखले जातात. कौशिक यांच्या निधनाची वार्ता पहिल्यांदा अनुपम खेर यांना समजली. त्यांनीच समाजमाध्यमांवरून सगळय़ांना कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. अनुपम खेर, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, पंकज त्रिपाठी, जावेद अख्तर, बोनी कपूर, ईशान खत्तार अशा त्यांच्याबरोबर काम केलेल्या समकालीन आणि नवीन कलाकारांनी आपल्या लाडक्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली होती.
सतीश कौशिक कायम चरित्र भूमिकांमध्ये झळकले आणि त्यांनी त्या व्यक्तिरेखा लोकप्रियही केल्या. ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील कॅलेंडर, भांजे म्हणत अक्षय कुमारला अनेक कल्पना ऐकवणारा ‘मिस्टर अॅण्ड मिसेस खिलाडी’मधील चंदामामा, ‘दीवाना मस्ताना’ चित्रपटातील पप्पू पेजर अशा त्यांच्या काही व्यक्तिरेखा कमालीच्या लोकप्रिय झाल्या. मूळचे हरयाणाचे असलेल्या सतीश कौशिक यांनी दिल्लीत आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ आणि ‘एफटीआयआय’ मधूनही प्रशिक्षण पूर्ण केले. एनएसडीत असतानाच त्यांची अनुपम खेर यांच्याशी मैत्री झाली होती जी अखेपर्यंत कायम होती. कामासाठी मुंबई मायानगरीची वाट पकडलेल्या सतीश कौशिक यांनी रंगभूमीवरही काम केले. ‘जाने भी दो यारो’ या १९८३ साली प्रदर्शित झालेल्या कुंदन शाह दिग्दर्शित चित्रपटासाठी त्यांनी संवादलेखनही केले होते आणि छोटेखानी भूमिकाही केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमधून छोटय़ा-मोठय़ा भूमिका केल्या. १९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील कॅलेंडर या त्यांच्या व्यक्तिरेखेने त्यांना पहिल्यांदा लोकप्रियता मिळवून दिली. मात्र अभिनय क्षेत्रातच न रमता पटकथालेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी स्वत:ला आजमावून पाहिले. ‘कथासागर’, ‘द ग्रेट इंडियन फॅमिली ड्रामा’ अशा मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या होत्या.
दिग्दर्शनात ठसा १९९३ साली प्रदर्शित झालेला भव्यदिव्य असा ‘रुप की रानी चोरों का राजा’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. खूप गाजावाजा आणि प्रचंड खर्च करून निर्मिती करण्यात आलेला हा चित्रपट तिकीट खिडकीवर चांगलाच आपटला. पाठोपाठ १९९५ मध्ये त्यांनी तब्बूचे पदार्पण असलेल्या ‘प्रेम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हाही चित्रपट फारसे यश मिळवू शकला नाही. ‘मिस्टर बेचारा’ हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा तिसरा चित्रपटही अपयशी ठरला. मात्र त्यांनी हार मानली नाही. १९९९ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके दिल में रहते है’ या अनिल कपूर आणि काजोलची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाने त्यांना दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा यश मिळवून दिले. सलमान खानच्या सर्वात गाजलेल्या ‘तेरे नाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही सतीश कौशिक यांनीच केले होते. ओटीटी या नवमाध्यमापासूनही ते लांब राहिले नाहीत. २०२१ मध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी यांना घेऊन केलेला एका वेगळय़ा विषयावरचा ‘कागज’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट ‘झी ५’ या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटाच्या पुढील भागाचे चित्रीकरणही कौशिक यांनी पूर्ण केले होते. आणखी एका चित्रपटाच्या तयारीत ते गुंतले होते. त्यांना पुन्हा रंगभूमीसाठीही काम करायचे होते, अशी माहिती अनुपम खेर यांनी दिली आहे.
वयाचे काय..?
माझ्याकडे कामांची लांबलचक यादी आहे आणि मी ते पूर्ण करणार, अशा उत्साहात त्यांनी आपली कामाप्रतिची तळमळ ‘थर’ या चित्रपटाच्या प्रसिध्दी कार्यक्रमादरम्यान बोलून दाखवली होती. अत्यंत हसतमुख, चित्रपटसृष्टीतील जुन्या-नव्या कलाकारांबरोबर सहजपणे रमणारा, त्यांच्याबरोबर काम करणारा आणि त्यांच्याकडून काम करवूनही घेणारा हा कलाकार खरोखरच सगळय़ांमध्ये लोकप्रिय होता. सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात त्यांची अखेरची भूमिका असल्याचे सांगितले जाते.
श्रद्धांजली
प्रसिद्ध चित्रकर्मी सतीश कौशिकजी यांच्या अकाली निधनाचे दु:ख झाले. उत्तम अभिनय आणि दिग्दर्शनाने सर्वाची मने जिंकणारे ते सृजनशील व्यक्ती होते. त्यांच्या कामाने त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांचे मी सांत्वन करतो. ओम शांती..-नरेंद्र मोदी, पंतप्रधान
प्रेम आणि विनोदाची ऊब असलेला सतीश गेल्या ४० वर्षांपासून माझ्या भावासारखा होता. तो माझ्यापेक्षा १२ वर्षांनी लहान.. सतीशजी.. आता तुमची वेळ नव्हती. –जावेद अख्तर, प्रसिद्ध कवी-गीतकार
मृत्यू हे अंतिम सत्य आहे, याची मला जाणीव आहे. पण माझा जीवलग मित्र सतीश कौशिकबद्दल हे लिहावे लागेल, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. ४५ वर्षांच्या मैत्रीला अचानक पूर्णविराम लागला. सतीशविना आयुष्य आधीसारखे कधीच नसेल. ओम शांती..-अनुपम खेर, ज्येष्ठ अभिनेते