कलाकार स्वेच्छेने आपली कला सादर करतो. त्याला स्वत:ला त्यातून आनंद मिळतो आणि स्वत: आनंद घेतल्याशिवाय तो आपली कला उत्तम प्रकारे सादर करू शकत नाही. म्हणून मी रंगभूमीची सेवा करतो आहे म्हणजे कोणावर उपकार करतो आहे, असा अभिनिवेश निरर्थक आहे, असे परखड मत ज्येष्ठ लेखक – अभिनेते सौरभ शुक्ला यांनी शनिवारी व्यक्त केले. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबईची ‘एकूण पट- १’ महाराष्ट्राची लोकांकिका ; महाअंतिम सोहळ्यात आशय, सादरीकरणाला दाद     

‘लोकसत्ता लोकांकिका’ या  आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या आठव्या पर्वाचा दिमाखदार महाअंतिम सोहळा शनिवारी, १६ डिसेंबरला माटुंगा येथील यशवंत नाटयमंदिरात तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात रंगला. या सोहळयाला रंगभूमी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सौरभ शुक्ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘‘एक कलाकार म्हणून मी अजूनही या स्पर्धेतील तरुण स्पर्धकांप्रमाणेच नवशिका आहे. मला कलेबद्दल खूप काही कळते, अशी माझी धारणाच नाही, त्यामुळे मी इथे ज्ञानप्रदर्शन करणार नाही,’’ अशी ठाम भूमिका घेत शुक्ला यांनी या क्षेत्रातील आजवरचे अनुभव, निरीक्षण याआधारे कलाकार आणि कला यांच्यातील नाते उलगडले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी विविध मुद्दयांवर सौरभ शुक्ला यांना बोलते केले. लेखक, दिग्दर्शक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या सौरभ शुक्ला यांनी, कलाकाराने अष्टपैलू असलेच पाहिजे, असे मत व्यक्त केले. अभिनेत्याला लिहिता आले पाहिजे. कुठल्याही अभिनेत्यासाठी त्याची कल्पनाशक्ती महत्त्वाची असते. लेखनातून तुमची कल्पकता खुलत जाते. अगदी व्यावसायिक लेखक नव्हे, पण अभिनेत्याने लिहिते व्हायला पाहिजे, असा आग्रही मुद्दा त्यांनी मांडला. रंगभूमीवरील त्यांचे अनुभव, परदेशातील नाटयकला, आपल्याकडे केले जाणारे सादरीकरण, त्यामागचा विचार अशा विविध विषयांवर त्यांनी मनमोकळेपणाने आपले विचार मांडले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actor saurabh shukla attend grand finale of loksatta lokankika zws