रुपेरी पडद्यावर बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून नायिका म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नंदा यांचे मंगळवारी सकाळी वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. मराठी चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटविणारे मास्टर विनायक (विनायक कर्नाटकी) यांच्या त्या कन्या होत्या. अभिनेत्री नंदा यांची ओळख आजही ‘बेबी नंदा’ याच नावाने होती. ७० हिंदी चित्रपटातून भूमिका केलेल्या नंदा यांनी सहा मराठी चित्रपटातूनही आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली होती.
१९४८ मध्ये ‘मंदिर’ या हिंदी चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर ‘बेबी नंदा’ या नावाने पदार्पण केले. पुढे ‘जग्गू’, ‘अंगारे’, ‘जागृती’, ‘जगद्गुरु शंकराचार्य’, आदी चित्रपटातून नंदा यांनी बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर ‘बंदिश’, ‘शतरंज’ या हिंदी चित्रपटांतही त्यांनी काम केले. पण १९५६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुफान और दिया’ या चित्रपटाने त्यांना हिंदीत खरी ओळख मिळाली. हा चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरला. १९५७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘भाभी’ हा चित्रपटही गाजला. याच चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री म्हणून ‘फिल्मफेअर’चा पुरस्कारही मिळाला. देव आनंद यांच्याबरोबरचा त्यांचा ‘हम दोनो’ हा चित्रपटही गाजला. राजेश खन्ना, शशी कपूर, सुनील दत्त आदी नायकांबरोबरच त्यांनी काम केले होते. नंदा यांनी नायिका म्हणून अनेक चित्रपटात काम केलेच; पण त्याखेरीज हिंदी चित्रपटातून त्यांनी बहीण, पत्नी, आई तर आशिकी’ आणि ‘इत्तेफाक’ या चित्रपटात त्यांनी खलनायिका रंगविली.
हिंदी चित्रपटांबरोबरच नंदा यांनी ‘कुलदैवत’, ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘देव जागा आहे’, ‘देवघर’, ‘झाले गेले विसरून जा’ आणि ‘मातेविना बाळ’ आदी मराठी चित्रपटातून काम केले होते. ‘मंदिर’ या चित्रपटापासून बालकलाकार म्हणून १९४८ मध्ये सुरू झालेला त्यांचा रुपेरी पडद्यावरील प्रवास १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेमरोग’ या चित्रपटापर्यंत सुरू होता.
आणि ‘बेबी नंदा’ चा उदय झाला
‘खरे तर मला चित्रपटात काम करायचे नाही,’ असे नंदा यांनी आपल्या वडिलांना ठणकावून सांगितले होते. मात्र लता मंगेशकर यांनी बालकलाकार म्हणून तीन चित्रपटांत काम केल्यानंतर आपण आता बालकलाकार म्हणून काम करणार नाही, असे सांगितले, त्यानंतर मास्टर विनायक यांनी आपल्या मुलीला ‘बालकलाकार’ म्हणून कॅमेऱ्यासमोर उभे केले आणि ‘बेबी नंदा’चा उदय झाला.नंदा यांचे वडील मास्टर विनायक हे मराठी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक. त्यामुळे नंदा यांना अभिनय आणि चित्रपटाचे बाळकडू घरातून मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम हे नंदा यांचे मावसकाका. त्यांनी नंदा यांना ‘तुफान और दिया’ या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटात पहिली संधी दिली. बालकलाकार म्हणून ‘मंदिर’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलेल्या नंदा यांनी या चित्रपटात मुलाची भूमिका केली होती. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये ‘मजदूर’, ‘शोर’, ‘बडी दीदी’, ‘गुमनाम’, ‘जब जब फूल खिले’, ‘तीन देवियाँ’, ‘छोटी बहेन’, ‘धुल का फूल’ आदींचा समावेश आहे. निर्माते-दिग्दर्शक मनमोहन देसाई आणि नंदा लग्न करणार असल्याची चर्चा हिंदी चित्रपटसृष्टीत होती. मात्र देसाई यांच्या निधनानंतर नंदा यांनी अविवाहित राहण्याचे ठरविले.
नंदा यांच्यावर चित्रित झालेली प्रसिद्ध गाणी
‘लिखा है तेरी आखों किसका अफसाना’, ‘भय्या मेरे राखी के बंधन को निभाना’, ‘ये समा, समा है प्यार का’, ‘किसलिए मैने प्यार किया’, ‘नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे.’
माझी बालमैत्रीण गेली
पार्श्र्वगायिका म्हणून लौकीक मिळायच्या आधी मास्टर विनायक यांच्या चित्रपटांत मी काही भूमिका केल्या होत्या. त्या वेळी नंदा आणि माझी गट्टी जमली होती. त्या वेळी ती चार-पाच वर्षांची होती आणि तिने माझ्या लहान भावाची भूमिका केली होती. नंदा आणि तिची बहिण मीना या दोघीही माझ्या खूपच चांगल्या मैत्रिणी होत्या. नायिका म्हणून तिने पहिल्यांदाच काम केलेल्या ‘तुफान और दिया’ या चित्रपटात तिच्यासाठी मीच पाश्र्वगायन केले होते. त्यानंतरही मी तिच्या अनेक गाण्यांना आवाज दिला होता.
लता मंगेशकर
सहृदयी व्यक्ती
नंदासह मी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती अभिनेत्री म्हणून प्रतिभावान होतीच, पण व्यक्ती म्हणूनही ती प्रचंड सहृदयी होती. ‘गुमनाम’, ‘शोर’, ‘बेदाग’ अशा काही चित्रपटांमध्ये आम्ही एकत्र काम केले. मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली, त्या वेळी नंदा या क्षेत्रात स्थिरावली होती. मात्र माझ्यासारख्या नवख्या अभिनेत्याला तिने नेहमीच प्रोत्साहन दिले. सेटवर येण्याच्या बाबतीतही ती प्रचंड काटेकोर होती. तिच्याकडून मी खूप गोष्टी शिकलो. ती या जगात नाही, हा धक्का सहन करणे कठीण आहे.
मनोजकुमार