हसतमुख चेहरा आणि आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी चित्रपट व नाटय़सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. शनिवारी सायंकाळी दीर्घ आजाराने सुलभा देशपांडे यांचे राहत्या घरी निधन झाले होते.
सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास त्यांचे पार्थिव माहीम येथील निवासस्थानाहून स्मशानभूमीत आणण्यात आले. उपस्थितांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर कोणतेही धार्मिक विधी न करता विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक गोविंद निहलानी, ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर, ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे, ज्येष्ठ नाटककार आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह मिलिंद फाटक, अभिजित केळकर, ऋषिकेश कामेरकर, शफाअत खान, अविनाश खर्शीकर, कौस्तुभ सावरकर, नीलेश दिवेकर, किशोरी शहाणे, जयवंत वाडकर, अतुल परचुरे, अमरेंद्र धनेश्वर, श्रीरंग देशमुख, प्रदीप मुळ्ये आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान सुलभा देशपांडे यांचे पार्थिव दुपारनंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत माहीम येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. चित्रपट-नाटय़सृष्टीतील अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. मोहन जोशी, चंद्रकांत कुलकर्णी, नाना पाटेकर, महेश मांजरेकर, निशिगंधा वाड, सुनील बर्वे, रत्ना पाठक-शहा, वीणा जामकर, राजीव नाईक, दीपक करंजीकर, संजय नार्वेकर, सोनाली कुलकर्णी, विजय गोखले आणि अनेक मान्यवरांचा व चाहत्यांचा समावेश होता. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी माहीम येथे सुलभा देशपांडे यांचे अंत्यदर्शन घेतले.
पुरस्काराची रक्कम वृद्ध कलावंतांसाठी..
गेल्या वर्षीच १४ जून रोजी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेतर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज, रिमा आणि ज्येष्ठ नाटय़निर्मात्या लता नार्वेकर यांच्या हस्ते सुलभाताईंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पुरस्काराची मिळालेली २५ हजार रुपयांची रक्कम त्यांनी नाटय़ परिषदेच्या वृद्ध कलावंतांसाठी असलेल्या निवृत्त वेतन योजनेस देणगी म्हणून दिली होती. लहानपणापासून नाटकाचे संस्कार झाल्यामुळेच नाटकाकडे वळले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा