मुंबई : ‘‘माझ्या कारकिर्दीत मी काय केले, असे विचारले तर त्याचे एका शब्दात उत्तर म्हणजे ‘मनोरंजन’. माझ्या लेखनातून आणि ज्या ज्या रंजन माध्यमातून मी संचार केला, त्याद्वारे मी लोकांशी सुखसंवाद साधला. सकस आणि दर्जेदार मनोरंजनावर पोसलेला समूह हा प्रसन्न, प्रगत आणि समाधानी असतो असे मी समजते’’, अशा भावना ज्येष्ठ दिग्दर्शिका, नाटककार आणि पटकथाकार सई परांजपे यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ सोहळय़ात व्यक्त केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाचा ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ सई परांजपे यांना पिरामल ग्रुपच्या उपाध्यक्षा डॉ. स्वाती पिरामल आणि उषा काकडे ग्रुपच्या उषा काकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावर्षीचा ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ सोहळा दादर येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ येथे शुक्रवारी झाला. ‘सामान्यांतील असामान्य’ ठरलेल्या नऊ दुर्गाना आरती अंकलीकर – टिकेकर, उज्वला ग्रुपच्या उज्वला हावरे, निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर, मे. बी. जी. चितळे डेअरीचे गिरीश चितळे, केसरी टूर्सच्या सुनीता पाटील, पिरामल ग्रुपच्या उपाध्यक्षा डॉ. स्वाती पिरामल, उषा काकडे ग्रुपच्या उषा काकडे यांच्या हस्ते लोकसत्ता दुर्गा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हेही वाचा >>> ‘सीएसएमटी’च्या पुनर्विकासासाठी झाडांवर कुऱ्हाड; पर्यावरण रक्षणाचे धडे देणाऱ्या मध्य रेल्वेचा अजब निर्णय

यावेळी परांजपे म्हणाल्या, ‘‘एका सुंदर, संपन्न आणि मोलाच्या दुर्गा पुरस्कार सोहळय़ाची आपल्या सांस्कृतिक वेळापत्रकामध्ये नोंद झालेली आहे, हे मी अतिशय आनंदाने नमूद करते. महिला शक्तीचा जयजयकार सध्या वाढत्या प्रमाणात वातावरणात दुमदुमत असल्याचे जाणवते. पण खरेतर स्त्रीचा महिमा आपल्या देशात फार प्राचीन काळापासून नोंदवला गेला आहे. दुर्गा पुरस्कार विजेत्यांच्या कार्याची चित्रफित पाहताना मन गहिवरून येत होते. प्रत्येकीचा विषय, क्षेत्र, कार्यपद्धती आणि कर्तब हे वैशिष्टय़पूर्ण आहे. आपल्या कामाप्रति प्रचंड निष्ठा, समोर आलेल्या प्रत्येक अडचणीला टक्कर देऊन हाती घेतलेले कार्य तडीला नेण्याची जिद्द हा समभाव या प्रत्येकीमध्ये जाणवतो.’’ 

प्रत्येक दुर्गा पुरस्कार विजेतीचे वेगवेगळय़ा क्षेत्रात मूलभूत काम आहे. त्यामागे एक विचार आहे. काहीतरी प्रचलित मार्गाने न जाता स्वत:चे एक स्थान त्यांनी निर्माण केले आहे, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.

‘लोकसत्ता दुर्गा पुरस्काराच्या माध्यमातून आतापर्यंत ९० दुर्गाचा सन्मान करण्यात आला आहे. या साऱ्या दुर्गा समाजापुढील आदर्श आहेत. काहीवेळेला जाणीवपूर्वक, काहीवेळेला ठरवून तर काहीवेळेला अंगावर पडलं म्हणून अनेक आव्हाने स्वीकारत आलेल्या परिस्थितीला निर्धाराने तोंड देत त्या काम करत राहिल्या. त्यामुळेच त्या सामान्यातील असामान्य स्त्रिया ठरल्या’, अशा भावना ‘लोकसत्ता’ चतुरंग पुरवणीच्या फिचर एडिटर आरती कदम यांनी व्यक्त केल्या.

पुरस्कार सोहळय़ाची रंगत जीवनगाणीनिर्मित ‘स्वराशा’ या मैफलीने वाढवली. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी ज्या संगीतकारांसह काम केले ते सुधीर फडके, श्रीधर फडके हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली गाणी धनश्री देशपांडे, केतकी चैतन्य, राधिका नांदे आणि सोनाली कर्णिक यांनी सादर केली. रसिक प्रेक्षकांनी टाळय़ांचा कडकडाट करीत या सर्व गीतांना भरभरून दाद दिली. या सांगीतिक मैफलीचे सूत्रसंचालन कुणाल रेगे, तर पुरस्कार सोहळय़ाचे सूत्रसंचालन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी केले. सोहळ्याची संहिता ‘लोकसत्ता’चे शफी पठाण यांनी लिहिली होती.

‘सामान्यांतील असामान्य’ नऊ दुर्गाचा सन्मान

‘कचरावेचक ते पर्यावरणरक्षक’ असा प्रवास केलेल्या सुशीला साबळे, ‘खेळघर’च्या माध्यमातून शाळेपलीकडचे शिक्षण देणाऱ्या शुभदा जोशी, बहुविकलांग, गतिमंद मुलांसाठी गेली ४१ वर्षे काम करणाऱ्या रेखा बागूल, अंधत्वावर मात करत एक आदर्श निर्माण करणाऱ्या डॉ. कल्पना खराडे, शेतीचा गंध नसतानाही आव्हानांना तोंड देत यशस्वी शेतकरी झालेल्या संगीता बोरस्ते, भारतातील पहिली त्वचापेढी सुरू करणाऱ्या डॉ. माधुरी गोरे, सात लाख हेक्टर जमिनीवर पाणलोट कामे करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या वैशाली खाडिलकर, शेती आणि जैवतंत्रज्ञानातले संशोधन करणाऱ्या डॉ. रेणुका करंदीकर, तिरंदाजी या क्रीडा प्रकारात भारताची जागतिक विजेती ठरलेली पहिली महिला खेळाडू अदिती स्वामी या नऊ दुर्गाना ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२३’ने गौरविण्यात आले.

यंदा वाचकांनी पाठवलेल्या नामांकनांमधून नऊ दुर्गाची निवड निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर, उद्योजिका अदिती कारे-पाणंदीकर आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी केली होती.

दोन वर्षांपूर्वी मी पद्म पुरस्कारांच्या निवड समितीवर होते. आपल्या देशात खूप चांगली कर्तृत्ववान माणसे आहेत हे पाहून खूप आनंद झाला. वयाच्या ऐंशी वर्षांनंतरही सई परांजपे लिहीत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वातील टोकदारपणा आजही कायम आहे. त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना मला अतिशय आनंद होत असून हे मी माझे भाग्य समजते.

– डॉ. स्वाती पिरामल, उपाध्यक्षा, पिरामल ग्रुप

दुर्गा पुरस्कार विजेत्या प्रत्येकीचा विषय, क्षेत्र, कार्यपद्धती आणि कर्तब  वैशिष्टय़पूर्ण आहे.  कामाप्रति प्रचंड निष्ठा, समोर आलेल्या अडचणीला टक्कर देऊन हाती घेतलेले कार्य तडीस नेण्याची जिद्द हा समभाव या प्रत्येकीमध्ये जाणवतो. 

– सई परांजपे, ज्येष्ठ दिग्दर्शिका

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran director sai paranjape honored with loksatta durga lifetime achievement award zws
Show comments