मुंबई : एक प्रयोगशील दिग्दर्शक आणि समांतर चित्रपटांचे जनक अशी ओळख असलेल्या श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर मंगळवारी (२४ डिसेंबर) दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुंबई पोलिसांच्या बँड पथकाद्वारे शोकधून वाजवून आणि बंदुकीच्या तीन फैरी झाडून बेनेगल यांना मानवंदना देण्यात आली.

बेनेगल यांना शेवटचा निरोप देण्यासाठी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कुटुंबिय उपस्थित होते.श्याम बेनेगल गेल्या काही वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, आजाराशी झुंज देत असतानाच सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी निरा आणि मुलगी पिया असा परिवार आहे. समांतर चित्रपटांची चळवळ उभी राहण्यात बेनेगल यांचे महत्वपूर्ण योगदान असून त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य आहे, अशी भावना मान्यवरांनी बेनेगल यांचे अंत्यदर्शन घेतल्यावर व्यक्त केली.

हेही वाचा – मुंबई महापालिकेतील ५८५ कर्मचारी अद्यापही निवडणूक कामात व्यस्त

श्याम बेनेगल यांचे पार्थिव मंगळवारी दुपारी जवळपास एक तास दादर येथील स्मशानभूमीत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मनोरंजनसृष्टीतील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी स्मशानभूमी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, तसेच वाहतूक पोलिसांनीही परिसरातील वाहतुकीचे विशेष नियोजन केले. अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या व्यक्तींच्या माहितीसाठी ‘श्याम बेनेगल यांच्या अंत्यविधी स्थळाकडे जाण्याचा मार्ग’ असे फलकही स्मशानभूमी परिसरात लावण्यात आले होते. बेनेगल यांच्या पार्थिवावर विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांना अश्रू अनावर झाले.

श्याम बेनेगल यांना अखेरचा निरोप देताना मनोरंजनसृष्टी भावूक

श्याम बेनेगल यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्याबरोबर काम केलेले सहकलाकार, दिग्दर्शक, निर्माते भावूक झाले होते. ज्येष्ठ कवी व गीतकार गुलजार, ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा आणि त्यांची पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शहा व मुलगा अभिनेता विवान शाह, ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणी, ज्येष्ठ लेखक व गीतकार जावेद अख्तर, जाहिरातकार प्रल्हाद कक्कड, दिग्दर्शक गोविंद निहलानी, ज्येष्ठ अभिनेत्री इला अरुण, दिग्दर्शक हंसल मेहता, चित्रपटकर्मी अशोक पंडित, भाजप आमदार व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, अभिनेता श्रेयस तळपदे, सचिन खेडेकर, कुणाल कपूर, अतुल तिवारी, प्रतीक गांधी, वरुण बडोला, अभिनेत्री दिव्या दत्ता, अभिनेते व दिग्दर्शक रजित कपूर, गीतकार व गायक स्वानंद किरकिरे आदी मनोरंजनसृष्टीतील कलाकार व मान्यवरांनी दादरमधील स्मशानभूमीत उपस्थित राहत श्याम बेनेगल यांचे अंत्यदर्शन घेतले.

वास्तवदर्शी चित्रपटांचे जनक

श्याम बेनेगल हे वास्तवदर्शी चित्रपटांचे जनक होते. त्यांचा ‘अंकुर’ हा पहिला चित्रपट १९७४ साली प्रदर्शित झाला होता, तेव्हापासून गेल्या ५० वर्षांत त्यांनी विविधांगी चित्रपट, माहितीपट आणि लघुपटांची निर्मिती केली. त्यांनी एक नवीन चेतना आणि विचार हिंदी चित्रपटसृष्टीला दिला, यामध्ये काहीच शंका नाही. श्याम बेनेगल यांच्यासारखे लोक फार कमी असतात आणि त्यांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. युवा पिढीने त्यांचे सर्व चित्रपट पुन्हा पहावेत आणि त्यांचे काम पुढे न्यावे. – जावेद अख्तर, ज्येष्ठ लेखक व गीतकार

कलाकार म्हणून समृद्ध झालो…

एक कलाकार म्हणून श्याम बेनेगल यांच्याबरोबर काम करणे हे माझे स्वप्न होते आणि जेव्हा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. तो अनुभव अविस्मरणीय होता. चित्रपट, आयुष्य, सामान्य ज्ञान, साहित्य, कला, मानवता आदी विविध गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. एक दिग्दर्शक म्हणून ते सर्वांना समान वागणूक द्यायचे. त्यांच्यासोबत वेळ घालवणे म्हणजे स्वतःला समृद्ध करणे असायचे. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. – बोमन इराणी, ज्येष्ठ अभिनेते

हेही वाचा – राजकीय फलकबाजीला प्रतिबंध करा; आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन

त्यांनी दिलेली शिकवण कृतीत उतरवण्याचा प्रयत्न

श्याम बेनेगल हे खूप मोठे व्यक्तिमत्व होते. मी खूप भाग्यवान आहे, मला ‘वेलकम टू सज्जनपूर’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटासंदर्भातील आठवणी आजही ताज्या आहेत. प्रत्येक प्रसंगाबद्दल ते बारकाईने सांगायचे, तसेच एखाद्या प्रसंगामध्ये सुधारणा करताना सामाजिक संदर्भांचा समावेश केल्यास संबंधित प्रसंगाला अधिक महत्त्व प्राप्त होते, ही त्यांनी दिलेली खूप मोठी शिकवण आहे. मी शक्य तेव्हा हा विचार कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करतो. – श्रेयस तळपदे, अभिनेता

चित्रपटांमधून बेनेगल उमजले

आयुष्यात श्याम बेनेगल यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही वा त्यांना कधी वैयक्तिकरित्या भेटताही आले नाही, या गोष्टीचे दुःख नेहमीच मनात असेल. मी लहानपणापासून त्यांचे चित्रपट पाहात आलो आहे. त्यांच्या चित्रपटांमधून त्यांचे व्यक्तिमत्व उलगडत गेले. श्याम बेनेगल यांच्यासारखा प्रतिभावंत एखादाच असतो. – प्रतीक गांधी, अभिनेता

Story img Loader