‘माझा पुरस्कार’ सोहळ्यात ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांचे प्रतिपादन; ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव
मुंबई : नाटक कधीही मरत नाही आणि मरणार नाही या ज्येष्ठ दिग्दर्शक बी. व्ही. कारंथ यांनी एका चर्चासत्रात केलेल्या विधानाची आठवण करून देत नाटक मरत असल्याची ओरड करणाऱ्यांना संयम बाळवण्याचे आवाहन ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी केले. जोवर दोन व्यक्तींमधील संवाद जिवंत आहे, तोवर नाटक सुरूच राहील. विशिष्ट काळासाठी ते निद्रितावस्थेत गेले तरी त्याला जागृत करणारी पिढीही जन्माला येत असते. म्हणून आपण थोडा संयम बाळगायला हवा, असेही केंकरे यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी ‘माझे असेही एक नाट्य संमेलन’ आणि ‘माझा पुरस्कार’ हा कार्यक्रम दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे गुरुवारी आयोजित केला होता. त्यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून केंकरे बोलत होते. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते.
या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना माझा जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले, तर ‘गोदावरी’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता जितेंद्र जोशी, ‘आई कुठे काय करत’े या मालिकेची पटकथा लेखिका नमिता नाडकर्णी आणि दिग्दर्शक रवी करमरकर यांना माझा पुरस्काराने गौरवले गेले.
मुळ्ये यांचा खूप वर्षे रंगभूमीवर वावर आहे. त्यांनी आता परोपकारी गंपूच्या भूमिकेतून बाहेर येऊन लिहिते व्हावे. तसे झाल्यास रंगभूमीचा चालता बोलता इतिहास वेगळ्या दृष्टीने आपल्यासमोर येईल, असे मत चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
मी आयोजित केलेले हे अखेरचे नाट्यसंमेलन आहे. यानंतर केवळ माझा पुरस्कार सुरू राहील, असे अशोक मुळ्ये यांनी यावेळी जाहीर केले. सांगीतिक कार्यक्रम, नाट्यक्षेत्रातील आठवणी, गप्पा यांची मैफल यावेळी रंगली. संजय मोने, सुकन्या कुलकर्णी, आदेश बांदेकर, अतुल परचुरे, अजित भुरे, संजय नार्वेकर, अंकुश चौधरी आणि अनेक रंगकर्मी यावेळी उपस्थित होते.
नाटक म्हणजे शिस्त- अशोक सराफ
नाटक साकारणे वाटते तितके सोपे नाही. नाटक साकारायचे असेल तर शिस्त महत्वाची असते, असे मत अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले. मी आजही प्रयोगाआधी तासभर नाट्यगृहात हजर असतो. प्रयोगापूर्वी किमान काही वेळ शांत राहून नटाने नाटकाचे चिंतन करावे, असे मला वाटते. जे मी स्वत: आचरणात आणत आलो आहे, असेही त्यांनी यावेळी प्रामुख्याने सांगितले. कोणतीही भूमिका अभ्यासाशिवाय साकारली जाऊ शकत नाही. माझ्या अभिनय कारकीर्दीसाठी आजपर्यंत मला अनेक पुरस्कारांनी गौरवले गेले आहे. पण एका माणसाने दिलेला हा पहिला पुरस्कार आहे. वयाच्या अठ्ठ्याहत्तरीमध्येही कलेसाठी नि:स्वार्थी काम करणाऱ्या मुळ्ये यांचा गौरव आपण सर्व रंगकर्मींनी करायला हवा. त्यात पहिला सहभाग माझा असेल, असेही सराफ यांनी माझा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना नमूद केले.