मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि ‘मार्मिक’चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचे वृद्धापकाळाने शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सूना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पंढरीनाथ सावंत यांच्या पार्थिवावर मुंबईतील भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांतील मंडळी उपस्थित होती.

गिरणगावातील काळाचौकी येथील दिग्विजय गृहसंकुल (दिग्विजय मिल पत्रा चाळ) येथे वास्तव्यास असलेले पंढरीनाथ सावंत यांचा परखड, थेट आणि रोखठोक मते मांडणारा पत्रकार असा नावलौकिक होता. ते प्रबोधनकार ठाकरे यांचे शिष्य, बाळासाहेब व श्रीकांत ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि ठाकरे कुटुंबाचे निकटवर्तीय होते. महाडमधील विन्हेरे हे त्यांचे मूळ गाव. वडील पोलीस खात्यात असल्याने भोईवाडा येथील कर्मचारी निवासस्थानात त्यांचे बालपण गेले. तसेच चित्रकलेत पारंगत असल्याने ते माध्यम क्षेत्राशी जोडले गेले. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात ‘बेस्ट’ उपक्रमात काम केल्यानंतर त्यांनी पत्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

पंढरीनाथ सावंत यांनी शोध पत्रकारितेच्या माध्यमातून विविध विषयांवर सखोल लेखन केले, तसेच अनेक प्रश्नांना निर्भीडपणे वाचाही फोडली. पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातर्फे देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार’, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर कक्षातर्फे देण्यात येणारा ‘कृ. पा. सामक जीवनगौरव पुरस्कार’ आदी पुरस्कारांनी सावंत यांना गौरविण्यात आले होते. गिरणगावात जडणघडण झाल्यामुळे सावंत यांना तेथील माणसांबद्दल विशेष जिव्हाळा होता. त्यांनी लालबाग – परळ येथे राहणाऱ्या कापड गिरणी कामगारांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी आणि स्वतःच्या जीवनातील विविध अनुभव मांडण्यासाठी ‘मी पंढरी गिरणगावचा’ हे आत्मचरित्र लिहिले. विशेष बाब म्हणजे त्यांनी आंतरराष्ट्रीय विषयांवरही लेखन केले. त्यांच्या निधनाने माध्यमक्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून एका हुशार आणि निर्भीड पत्रकाराला मुकल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत, माजी मंत्री सुभाष देसाई, भायखळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज जामसुतकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर, शिंदे गटाच्या माजी आमदार यामिनी जाधव आदींनी सावंत यांच्या राहत्या घरी जाऊन अंत्यदर्शन घेतले

(प्रतिक्रिया)

निर्भिडता आणि व्यासंग यांचा मिलाफ असलेले मराठी पत्रकारितेतील मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. सावंत यांनी मराठी पत्रकारितेत आपल्या लेखन शैलीने ओळख निर्माण केली. प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांना सहवास लाभल्याने, त्यांना रोखठोक भूमिका मांडण्याचा वसा मिळाला होता. सावंत यांनी आंतरराष्ट्रीय विषयांवरही नेमकेपणाने चित्रण केले. त्यांचा हा व्यासंग आणि निर्भिडता पत्रकारितेतील नव्या पिढीसह अनेकांना मार्गदर्शकच राहील. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पंढरीनाथ सावंत यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेतील तीन पिढ्यांचा दुवा निखळला आहे. अफाट जनसंपर्क, अद्ययावत माहिती आणि अनोखी लेखनशैली असलेले पंढरीनाथ सावंत हे प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. १९७२ मधील महाराष्ट्रातील दुष्काळ स्थिती, जयप्रकाश नारायण यांचे संपूर्ण क्रांती आंदोलन आदींच्या त्यांनी केलेल्या वृत्तांकनाने त्यांनी मराठी पत्रकारितेच्या वाटचालीत मोलाची भूमिका बजावली होती. अनेक विषयांवरील त्यांच्या पुस्तकांनी मराठी साहित्यविश्वाचे दालनही समृद्ध झाले आहे. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

मुंबईतील गिरणगावात वाढलेले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा परिसस्पर्श लाभलेले पंढरीनाथ सावंत महाराष्ट्राच्या गेल्या पाऊण शतकाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. त्यांनी केलेले वार्तांकन, लिहिलेले लेख, पुस्तके ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा, समृद्ध जडणघडणीचा मोलाचा दस्तावेज आहेत. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या पत्रकार संघाच्या कार्यक्रमात त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांकडे त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली होती. त्यांचे निधन ही महाराष्ट्राच्या पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. अजित पवार, उपमुख्यमंत्री

Story img Loader