दूरदर्शनवरील वृत्तनिवेदिका ते यशस्वी अभिनेत्री, निर्माती व दिग्दर्शिका अशी बहुआयामी ओळख निर्माण करणाऱ्या तसेच कर्करोगाशी जिद्दीने झुंज देत इतरांसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात वडील, मुलगा अंबर, मुलगी आरती, सून सुलेखा, जावई व नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते.
२०१०मध्ये त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थिती, अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शनातून त्यांनी तात्पुरती विश्रांती घेतली होती. मात्र, केमोथेरपी आणि त्याच्या दुष्परिणामांना जिद्दीने तोंड देत त्यांनी पुन्हा चित्रपट, मालिका व रंगभूमीवर पूर्वीच्याच उत्साहाने काम सुरू केले. ‘दुर्गाबाई जरा जपून’ हे नाटक त्यांनी केले होते. त्यापूर्वी ‘कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या’ हे नाटकही केले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा कर्करोग पुन्हा बळावला होता.
स्मिता यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मराठी चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिका आदी क्षेत्रांतील अनेकजण उपस्थित होते. ‘सांज लोकसत्ता’ या दैनिकात त्यांनी ‘पिंपळपान या शीर्षकाअंतर्गत काही काळ स्तंभलेखनही केले होते.
*थक्क करणारा कलाप्रवास
*मान्यवरांची श्रध्दांजली
*राष्ट्रीय पुरस्कार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा