स्वातंत्र्योत्तर काळातील मध्यमवर्गीयांच्या मानसिकतेचा आपल्या कथांमधून अत्यंत प्रसन्नपणे वेध घेणारे ‘आनंदमूर्ती’ साहित्यिक म्हणून शं. ना. नवरे हे नाव कायम स्मरणात राहतील. मराठी मध्यमवर्गीयांच्या सुख-दु:खांशी निकटचे नाते असणाऱ्या शन्ना यांनी आपल्या कथा-कादंबऱ्या, सदरलेखन यातून सातत्याने सत्य, शिव आणि सुंदराची आराधना केली. हेच त्यांच्या लोकप्रियतेचे गमक होते. शन्ना यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२८चा. बीएससी झालेल्या शन्नांच्या अंगी मानवी भावभावनांच्या खेळाचा वेध घेण्याची अफाट ताकद होती आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या विविध कथा, कादंबऱ्या, नाटके व चित्रपटांमधून उमटले. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात, तसेच नंतर भाषा संचालनालयात उपसंचालक पदी ते कार्यरत होते. मात्र सरकारी सेवेचा खाकीपणा त्यांच्या मनावर कधी चढला नाही. ऐन पन्नाशीत सेवानिवृत्ती घेऊन त्यांनी आपला उर्वरित काळ निखळ साहित्यसेवेत व्यतीत केला.
शन्नांच्या कथालेखनाला प्रारंभ झाला तो तब्बल सहा दशकांपूर्वी, १९५१ मध्ये. अलीकडे त्यांनी वयोपरत्वे आपले लिखाण कमी केले होते. मात्र, त्यांचे निरीक्षण, मिस्किल वृत्ती कायम होती. कोणत्याही साध्या घटनेला तत्कालिकतेकडून सार्वकालिकतेकडे नेण्याचे त्यांचे कसब अफाट होते. ‘शन्नाडे’ व ‘ओली-सुकी’ या ललित लेखसंग्रहांतील अनेक लेख याची साक्ष देतात. त्यांचे २५ हून अधिक कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरले. त्यांनी लिहिलेल्या आनंदाचे झाड, सुरूंग, दिवसेंदिवस, नो प्रॉब्लेम, दिनमान, कौल, अट्टाहास या कादंबऱ्याही गाजल्या. आनंदाचे झाड या कादंबरीवर काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपट निघाला होता. तर ‘नो प्रॉब्लेम’ कादंबरीवर दोन दशकांपूर्वी दूरदर्शन मालिका सादर झाली होती.
त्यांची नाटकेही रसिकांच्या पसंतीस उतरली. जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरील ‘गुंतता हृदय हे’ हे नाटक तर विशेष गाजले. ‘गहिरे रंग’, ‘रंगसावल्या’, ‘धुम्मस’, ‘सूर राहू दे’, ‘वर्षांव’, ‘धुक्यात हरवली वाट’, ‘नवरा म्हणू नये आपला’, ‘गुलाम’, ‘हसत हसत फसवुनी’, ‘प्रेमगंध’, ‘एक असतो राजा’, ‘मन पाखरू’, ‘मंजू मंजू’, ‘देवदास’, ‘ग्रँड रिडक्शन सेल’, ‘हवा अंधार कवडसा’ आदी नाटके शन्नांच्या नावावर आहेत.
त्यांच्या कथा कादंबऱ्यांवर निघालेले अनेक मराठी चित्रपट गाजले. विवाहित पुरुषाचे परस्त्रीशी असलेले संबंध हा धाडसी विषय. अशा विषयास अनुसरून त्यांनी ज्या चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या, त्यामध्ये ‘घरकुल’, ‘कळत नकळत’, ‘सवत माझी लाडकी’, आदी चित्रपटांचा समावेश आहे. ‘तू तिथं मी’, ‘बाजीरावाचा बेटा’, ‘कैवारी’, ‘जन्मदाता’, ‘झंझावत’, ‘एक उनाड दिवस’, ‘हेच माझं माहेर’, ‘असंभव’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘बिरबल माय ब्रदर’, ‘निवडुंग’ हेही त्यांच्या कथांवर आधारलेले चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत. ‘लोकसत्ता’त १९८८ मध्ये दर रविवारी प्रसिद्ध होणारे ‘शन्नाडे’ आणि २००३ मधील ‘ओली-सुकी’ ही त्यांची सदरे कमालीची लोकप्रिय ठरली होती.
‘आगबोटीची कुळकथा’, ‘असे त्यांचे शोध’, ‘पुन्हा प्रपंच’ ( श्रृतिका), आकाशवाणी, दूरदर्शनवर अनेक लघुपट, मालिका शं.ना. नवरे यांनी लिहिल्या. साहित्यिक, चित्रपट, नाटय़, ललित लेखन, एकांकिका, पटकथा, संवादलेखन, आदी विषयांवर विपुल लेखन. ‘पीस कोअर’तर्फे परदेशी नागरिकांना मराठी शिकवण्यासाठी त्यांनी अमेरिका वारी केली. साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असे. कराड येथे २००४ मध्ये झालेल्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपद शं.ना. नवरे यांनी भूषविले होते. त्याआधी, १९९६ मध्ये झालेल्या को. म. सा. प.चेही ते अध्यक्ष होते. मेनका प्रकाशनचा ‘पु. भा. भावे’ पुरस्कार, नाटय़दर्पणचा ‘नाटय़भूषण’ पुरस्कार, अखिल भारतीय नाटय़ परिषद ‘गडकरी पुरस्कार’, रंगतरंगचा ‘उतराई पुरस्कार’, टिळकनगर शिक्षण प्रसार मंडळाचा ‘तेजस’ पुरस्कार, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा ‘स्वामी विवेकानंद पुरस्कार’, ‘विष्णुदास भावे पुरस्कार’, ‘गदिमा पुरस्कार, पुणे’, ‘नाटय़गौरव पुरस्कार’, पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद रत्नागिरी टिळक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाच्या अनेक पुरस्कारांचे शं.ना. मानकरी ठरले. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यरसिकांवर आनंदाची बरसात करणारा प्रसन्न पारिजात हरपला आहे..
एक प्रसन्न पारिजात!
स्वातंत्र्योत्तर काळातील मध्यमवर्गीयांच्या मानसिकतेचा आपल्या कथांमधून अत्यंत प्रसन्नपणे वेध घेणारे ‘आनंदमूर्ती’ साहित्यिक म्हणून शं. ना. नवरे हे नाव कायम स्मरणात राहतील.
First published on: 26-09-2013 at 05:35 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran marathi writer shankar narayan navare