मुंबई : मुंबई महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने श्वान आणि मांजरींच्या संदर्भातील तक्रारींसाठी एक मोबाइल ॲप तयार केले आहे. श्वान चावणे, परिसरात श्वानांची संख्या वाढणे, भटके श्वान व मांजरींचा उपद्रव, कुत्रा व मांजरींचे लसीकरण, त्यांची नसबंदी अशा कोणत्याही तक्रारी आणि विनंती या ॲपवर करता येणार आहे. पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे (व्हीएचडी) हे ॲप स्वयंचलित असून यावर केलेल्या तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवण्याची प्रक्रिया ॲपद्वारे करण्यात येणार आहे.

अनेकदा परिसरात भटक्या श्वानांची किंवा मांजरांची संख्या वाढते, कधीकधी एखाद्या श्वानाला रेबीज झाल्याचा परिसरातील नागरिकांना संशय असतो, तर कधी कोणाचा पाळीव श्वान खूप भुंकत असतो.अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी प्राण्यांच्या संदर्भात असतात. आतापर्यंत नागरिकांना विभाग कार्यालयात जाऊन किंवा ई – मेलवर यासंदर्भातील तक्रारी करता येत होत्या. मात्र पुढे त्या तक्रारींचे काय होते याबाबत कोणालाही माहिती मिळत नव्हती. परंतु, आता महापालिकेने ॲप तयार केले असून त्यावर तक्रारींचा पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहिती पशुवैद्याकीय आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. हे ॲप सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे ४० तक्रारी आल्या आहेत. तक्रार संबंधित विभाग किंवा संबंधित सामाजिक संस्थेपर्यंत पोहोचवण्याचे काम या ॲपद्वारे केले जाते.

हेही वाचा : रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्प : रहिवाशांची पात्रतेची अंतिम यादी सोमवारपासून प्रसिद्ध करणार

या ॲपमध्ये जीपीएस आणि जिओफेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून प्राणी पकडण्याचे आणि सोडण्याचे अचूक स्थान त्यात नोंदवले जाते. तसेच जनावरांच्या आरोग्याची तपासणी, नसबंदी आणि लसीकरणाच्या वेळापत्रकाची नोंदही त्यात ठेवली जाते. माय बीएमसी मोबाइल ॲप आणि एमसीजीएम पोर्टलवरून या ॲपवर जाता येईल. महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊनही यासंदर्भात तक्रार करता येते.

हेही वाचा : पात्रता यादीत नाव असल्यास झोपडी विकण्याची मुभा मिळणार! घर विकण्यासाठी मात्र पाच वर्षांचीच मुदत

नागरिकांना तक्रारी करणे सोपे व्हावे, तसेच या तक्रारींवर वेळीच कार्यवाही करता यावी यासाठी महापालिकेच्या पशुवैद्याकीय विभागाने एक ॲप तयार केले आहे. पशुवैद्याकीय आरोग्य विभाग ( VHD) ॲप्लिकेशन असे त्याचे नाव असून महापालिकेच्या संकेतस्थळावरून या ॲपवर जाता येते.