गेल्या तीन दिवसांपासून मुंबईकर थायलंडहून आलेल्या हम्बोल्ट पेंग्विनना पाहण्यासाठी भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात गर्दी करीत आहेत. या प्राण्यांची देखभाल करणे हे सोपे काम नाही. सध्या या सात पेंग्विननी मुंबईतील वातावरणाशी जुळवून घेतले आहे. तरीही डोळ्यात तेल घालून तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक या पाहुण्यांची देखभाल करते आहे. या पथकाच्या प्रमुख पशुवैद्यक तज्ज्ञ डॉ. मधुमिता काळे यांच्याशी साधलेला हा संवाद.
आठवडय़ाची मुलाखत – डॉ. मधुमिता काळे
पशुवैद्यकतज्ज्ञ, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणी बाग)
* कितीही म्हटले तरी थायलंडसारख्या देशातील हवामानाशी मुंबईतील हवामानाची बरोबरी करता येणार नाही. अशा वेळेस हम्बोल्ट पेंग्विनच्या आहाराबरोबरच आरोग्याची काळजी कशी घेता?
पेंग्विनना मासे अतिशय प्रिय असतात. त्यामुळे त्यांच्या आहारात बोंबिल, तारली या माशांचा समावेश असतो. अनेकदा वातावरणानुसार त्यांच्या आहारात बदल करून काही वेळा बांगडा हा मासाही दिला जातो. प्रत्येक पेंग्विन दिवसाला साधारणपणे ७०० ते ८०० ग्रॅमचे मासे खातो. अशा रीतीने सात पेंग्विनसाठी दिवसाला ५ किलो माशांची गरज असते. दिवसातून दोन वेळा सकाळी ८.३० आणि दुपारी ३.३० या वेळेत त्यांना जेवण दिले जाते. या वेळी त्यांच्या वजनाकडेही कटाक्षाने लक्ष दिले जाते. आम्ही दर आठवडय़ाला त्यांचे वजन करतो. साधारण ३.५ ते ४.५ किलोपर्यंतचे वजन पेंग्विनच्या आरोग्यासाठी योग्य मानले जाते. त्याहून अधिक वजन झाले की त्याचा आहार नियंत्रणात आणला जातो. तसेच, एखाद्याचे वजन कमी असेल तर त्याचा आहार वाढविला जातो. आहाराशिवाय ते राहत असलेल्या परिसरातील हवा आणि पाण्याची शुद्धता दर तासाला तपासली जाते. पेंग्विन वावरत असलेल्या हवेत किमान ६० ते ७० टक्के आर्द्रता असणे आवश्यक असते. ही जास्त झाली तर या यंत्राच्या माध्यमातून आद्र्रतेवर नियंत्रण आणले जाते. त्याशिवाय आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपचारांवर भर दिला जातो. पेंग्विन आजारी असल्याचे संकेत लवकर दिसत नाहीत. हा पक्षी गंभीर आजारी असल्यावरच संकेत देतो. त्या वेळी हा पक्षी अन्न सोडतो, समूहापासून वेगळा राहतो. हे टाळण्यासाठी त्यांच्याकडे कायम लक्ष द्यावे लागते. पेंग्विनना मासे देताना मी कटाक्षाने तिथे उपस्थित राहते, कारण येथे पेंग्विनवरील उपचारांचा अनुभव असलेले तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे त्यांच्या वागण्यातील बदलावर लक्ष ठेवणे आवश्यक असते.
* नवीन घरात (पेंग्विन कक्ष) आल्यानंतर त्यांच्या वागणुकीत काही बदल झाला आहे का?
हो. नवीन घरी आल्यामुळे हे सातही पेंग्विन सध्या खूप आनंदात आहे. पोहायला मोठी जागा मिळाल्यामुळे ते दिवसभर खेळत असतात. खूप पोहतात. पोहण्यामुळे त्यांचा चांगला व्यायाम होतो. त्यामुळे त्यांना भूकही खूप लागते. नवीन प्रदर्शनीमध्ये आल्यापासून त्यांच्या आहारातही वाढ झाली आहे. थोडक्यात नवीन घर पेंग्विनना मानवले आहे. यांच्यातील ‘बबल’ आणि ‘मिस्टर मोइट’ ही सर्वात लहान पेंग्विन आहेत आणि सर्वात खोडकरही. ही दोघे खूप खेळतात आणि खेळण्यासाठी दुसऱ्या पेंग्विननाही खूप त्रास देतात. अनेकदा ही दोघे आमच्याशीही मस्ती करतात. यातील ‘मिस्टर मोइट’ याच्या नावाची कथाही खूप मनोरंजक आहे. पेंग्विन पक्ष्यांमध्ये शरीरावरील पिसे निघण्याच्या काळाला ‘मोइटिंग’ म्हणतात. मुंबईत येतानाचा काळ या पक्ष्याचा मोइटिंगचा काळ होता. त्यामुळे आपसूकच त्याचे नाव मिस्टर ‘मोइट’ पडले.
* पेंग्विनच्या जोडय़ांबद्दल..
सध्या पेंग्विनच्या दोन जोडय़ा तयार झाल्या आहेत. डोनल्ड-डेझी, ऑलिव्ह-पॉपाया अशा या जोडय़ा आहेत. हे चौघे जण दोन-दोनच्या जोडय़ा करून वेगळे राहू लागले आहेत. या वेळी ते एकमेकांना चाटतात आणि वेगवेगळे आवाजही काढतात. यावरून यांचे एकमेकांवरील प्रेम लक्षात येते. आणखी काही दिवसांत नवीन परिसराला हे चौघे जण रुळले की त्यांच्यात संबंध निर्माण होऊन येत्या वर्षभरात पाळणाही हलण्याची शक्यता आहे. पेंग्विनमध्ये संबंध आल्यानंतर साधारण दीड महिन्यांच्या काळानंतर मादी पेंग्विन अंडी देते. एका वेळी मादी पेंग्विन दोन अंडी देते. या पेंग्विनची खासियत म्हणजे एकदा निवडलेला साथीदार ते कधीच सोडत नाहीत. त्यामुळे या जोडय़ा सध्या कायम एकत्र दिसतात. मधल्या काळात एका पेंग्विनचा मृत्यू झाला. त्या वेळीही त्यांच्या वागणुकीत थोडा बदल झाला होता. आपल्यातील एक पक्षी कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतरचे अनेक दिवस हे पेंग्विन खूप ओरडत होते.
* पेंग्विनना हाताळण्याचा अनुभव तुमच्या गाठीशी कसा जमा झाला?
मला पूर्वीपासूनच वन्यजीव विषयात काम करण्याची इच्छा होती. त्यानुसार मी न्यूझीलंड येथील ‘मस्सी’ या विद्यापीठात पशुवैद्यक विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. तेथील रुग्णालयात अनेक वन्य पेंग्विन उपचारासाठी येत असत. उंदराच्या चावाने जखमी झालेल्या अनेक पेंग्विनवर मी या दोन वर्षांत उपचार केले आहेत. त्यामुळे पेंग्विनना सांभाळण्याचा अनुभव मला तिथेच मिळाला. भारतात वन्यप्राण्यासंदर्भात काम करण्यासाठी खूप संधी आहे. मला परदेशात काम करावयाचे नव्हते. त्यामुळे २०१६ मध्ये मी मुंबईत आले. त्या दरम्यान मुंबईत पेंग्विन येणार असल्याची चर्चा सुरू होती. मी या संदर्भात राणी बागेतील प्रमुखांशी संपर्क साधला आणि पुढे मला ही संधी मिळाली. सध्या राणी बागेतील अनेकांना मी पेंग्विनना सांभाळण्याकरिता प्रशिक्षण देत आहे.
* गेले काही दिवस पेंग्विनना पाहण्याकरिता पर्यटक गर्दी करत आहेत. याचा त्यांना काही त्रास होतो का?
हो. फार गर्दी पाहिल्यावर ते घाबरू शकतात. यामुळेच एका वेळेस २० ते ३० जणांना पेंग्विन पाहण्याकरिता परवानगी दिली जाते. जर सातत्याने पेंग्विनसमोर खूप माणसे येत राहिली तर कालांतराने त्यांना त्याची सवय होईल; परंतु त्यांच्या स्वास्थ्यासाठी हे धोकादायकही ठरू शकते.
मुलाखत – मीनल गांगुर्डे