मुंबई : काही महिन्यांपूर्वी अपघातात पाय गमावण्याची वेळ आलेल्या पाच वर्षांच्या गायीला कृत्रिम पाय प्रत्योरोपणामुळे नव्याने जगण्याची संधी मिळाली. गायीवर परळ येथील दी साकरबाई दिनशॉ पेटीट फॉर अॅनिमल (बैलघोडा रूग्णालय) येथे कृत्रिम पाय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, कृत्रिम पाय प्रत्यारोपणाची पहिलीच शस्त्रक्रिया असून ती यशस्वी झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा >>> अभिनेत्रीच्या घरी चोरी करणाऱ्या महिलेला मध्यप्रदेशातून अटक
पालघर येथे २०१९ मध्ये इन-व्हिट्रो फर्टिलायझेशनच्या माध्यमातून या गायीचा जन्म झाला होता. काही महिन्यांपूर्वी अपघातात गंभीर जखमी होऊन गायीला तिचा एक पाय गमवावा लागला. दरम्यान, मुंबई गोरक्षक मंडळाच्या सदस्यांनी गायीला परळ येथील बैलघोडा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमी गायीची अवस्था गंभीर असल्याचे लक्षात येताच गायीच्या पायाचा खालचा भाग कापण्यात आला. मात्र, गायीची जखम संपूर्ण बरी होण्यास तीन महिने लागले. जखम पूर्ण बरी झाल्यानंतर रुग्णालयातील तज्ज्ञांनी गायीच्या उजव्या बाजूच्या मागच्या पायावर कृत्रिम पाय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली.
हेही वाचा >>> मुंबईत आणखी ३७ आपला दवाखाने, सध्या २४३ दवाखाने कार्यान्वित
दरम्यान, शस्त्रक्रिया झाल्यावर गायीला सुरुवातील अर्ध्या तासासाठी पाय लावला जात होता. त्यानंतर आता सकाळी, सायंकाळी चार तासांसाठी कृत्रिम पाय लावला जात आहे. यानंतर काही दिवसांनी तिला आठ तासांसाठी दिवसातून तीन वेळा पाय लावण्यात येणार आहे. गायीला सवय होऊन तिच्या हालचाली पूर्वपदावर होऊ लागल्यानंतर तिला पाय कायमस्वरुपी लावण्यात येईल.