मुंबई : धावपळीच्या जीवनात येणारा मानसिक तणाव घालविण्यासाठी योग्यवेळी मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या प्रतिपादन कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांकरीता ’मनसंवाद’ या मानसिक आरोग्य हेल्पलाईनचा शुभारंभ कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमास विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. विठ्ठल धडके, डॉ. मिलिंद आवारे, डॉ. राजकुमार पाटील, तत्सम विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वाय. प्रविणकुमार, नर्सिंग विद्याशाखेच्या अधिष्ठात डॉ. श्रीलेखा राजेश, वित्त व लेखाधिकारी बोधिकिरण सोनकांबळे, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू उपस्थित होते. याप्रसंगी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, तणावमुक्त जीवन ही काळाची गरज आहे. धावत्या जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणात मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. सतत होणारी चिडचिड, असुरक्षितता, भीती वाटणे या परिस्थितीतून विद्यार्थी जात असतात मात्र त्यांना त्याची जाणीव नसते. युवकांमध्ये अपराधीपणाची भावना व तणावग्रस्तता वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचे निवारण करण्यासाठी विद्यापीठात चिकित्सा मानसतज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात वाटणारे भय, भिती किंवा मानसिक तणाव असल्याचे जाणविल्यास थेट विद्यापीठाच्या मानसिक आरोग्य हेल्पलाईनवर संपर्क साधावा. ही हेल्पलाईन कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांना नैतिक आधार, मानसिक आरोग्य समर्थन आणि मार्गदर्शन देण्यासाठी तयार करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा…माहीम मध्ये कोणाविरुद्ध कोण? अनिश्चित्ता!

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये मानसिक रोगांचे वाढते प्रमाण हा गंभीर विषय आहे. दैनंदिन जीवनात येणारा तणाव विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारिरीक आरोग्यावर परिणाम करतो, त्यासाठी विद्यापीठाकडून हेल्पलाई सुरु करण्यात आली आहे. कुलगुरुंच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या मनसंवाद हेल्पलाईनवर विद्यार्थ्यांनी विविध मानसिक समस्यांसाठी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘मनसंवाद’ हेल्पलाईन ८४८५०९२३५० क्रमांकावर संपर्क साधावा. मानसिक आरोग्याबाबत विद्यापीठाच्या चिकित्सा मानसतज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात येईल. याप्रसंगी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांना मानसिक आरोग्य, त्याचे दुष्परिणाम व घ्यावयाची काळजी याबाबत चिकित्सा मानसतज्ज्ञ मानसी शेखर हिरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. उपस्थितांचे आभार वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बाळासाहेब पेंढारकर यांनी मानले.