डॉ. विजय केळकर यांची अपेक्षा; पुरस्काराची पाच लाखांची रक्कम शाळेला भेट

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळी पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या सर्वागिण विकासाची मांडलेले स्वप्न तसेच नागपूर करारातील तरतुदीनुसार विदर्भ आणि मराठवाडा या मागास भागाला विकासात झुकते माप मिळालेच पाहिजे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांनी शनिवारी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते डॉ. केळकर यांना प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये, मानपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असून, पुरस्काराची सर्व रक्कम डॉ. केळकर यांनी यशवंतराव चव्हाण यांनी शिक्षण घेतलेल्या कराडच्या टिळक हायस्कूलला भेट म्हणून दिली. पाच लाखांची ही रक्कम शाळेच्या विकासासाठी वापरावी अशी भावना डॉ. केळकर यांनी व्यक्त केली आहे.

या वेळी पुरस्कार समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, निवृत्त सनदी अधिकारी शरद काळे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, खासदार सुप्रिया सुळे व आमदार हेमंत टकले हे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याच्या समतोल विकासाकरिता उपाय सुचविण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे डॉ. विजय केळकर हे अध्यक्ष होते. या समितीच्या अहवालावर अद्यापही राजकीय मतैक्य झालेले नाही.

या पाश्र्वभूमीवर बोलताना डॉ. केळकर यांनी राज्याच्या सर्वांगिण विकास व्हावा म्हणूनच समितीने काही उपाय सुचविले आहेत. विदर्भ आणि मराठवाडय़ाला झुकते माप मिळाले पाहिजे, ही आपली स्पष्ट भूमिका आहे. म्हणूनच समितीच्या अहवालाला ‘झुकते माप’ असे शिर्षक देण्याची आपली इच्छा होती. पण दुर्दैवाने तसे नाव देऊ शकलो नाही, अशी खंत डॉ. केळकर यांनी व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण हे अगळे- वेगळेच व्यक्तिमत्व होते. कोणताही पेचप्रसंग असो त्यावर ते अतिशय चलाखीने मात करीत असत व हे त्यांचे वैशिष्ट होते, असे डॉ. केळकर यांनी सांगितले. अनेकदा त्यांना राजकीय पेचप्रसंगांना सामोरे जावे लागले, पण त्यांनी समर्थपणे त्याचा सामना केला. १९६२ मध्ये चीनकडून मानहानी पत्करावी लागल्यावर यशवंतरावांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत पाचारण करण्यात आले. सैन्य दलात आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबरच लष्कराच्या आधुनिकीकरणावर त्यांनी भर दिला होता. यामुळेच १९६७चे पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळी आपण समर्थपणे उत्तर देऊ शकलो. १९६२च्यी चीन आक्रमणाच्या वेळी यशवंतराव चव्हाण हे संरक्षणमंत्री असते तर कदाचित वेगळे चित्र बघायला मिळाले असते, असे मतही डॉ. केळकर यांनी व्यक्त केले.

डॉ. केळकर हे मुळचे विदर्भातील असले तरी त्यांचे बालपण व शिक्षण हे सातारा परिसरातील मान्देशात झाले. माण, खटाव आदी  परसिरा कायम दुष्काळी भाग असला तरी या भागातील लोक आत्महत्या करीत नाहीत. कष्ट करण्याची मान्देशातील लोकांची कायम तयारी असते, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. देशाच्या आर्थिक क्षेत्रात डॉ. केळकर यांचे मोठे योगदान असल्याचेही पवार यांनी सांगितले.

Story img Loader