विदर्भात पारा चढाच राहणार; मराठवाडय़ाला दिलासा
मराठवाडय़ात आलेली उष्णतेची लाट ओसरणार असली तरी विदर्भ मात्र पुढील किमान दोन दिवस तापणार आहे. रविवारी मध्य महाराष्ट्र व विदर्भातील अनेक ठिकाणी पारा ४२ ते ४५ अंशांपर्यंत पोहोचला. मात्र राजस्थान, गुजरात या भागातील तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिसने घट होणार असून देशाच्या मध्य आणि पूर्व भागात तापमानात वाढ होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
शुक्रवारपासून महाराष्ट्रासह राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश, तेलंगणा, ओडिसा, प. बंगाल आदी राज्यांमध्ये शुक्रवारपासून तापमानात कमालीची वाढ झाली. विदर्भ व मराठवाडय़ातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान ४० अंश से. पलिकडे गेले. सोमवारपासून मराठवाडय़ातील बहुतांश भागातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र तापमान चढेच राहील. विदर्भाच्या जोडीनेच आंध्र प्रदेश व कर्नाटकातील तापमानही वाढेल. रविवारी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४५ अंश से. झाली. त्याखालोखाल नांदेडमध्ये ४४.५ अंश से. तर नागपूरमध्ये ४४.२ अंश से. तापमान होते. जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ येथेही पारा ४० अंश से. पलिकडे गेला. राज्यात इतरत्र तापमान वाढलेले असले तरी मुंबईसह कोकणाच्या बहुतांश भागात कमाल तापमान ३२ ते ३४ अंश से. दरम्यान मर्यादित राहिले आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम असून जनजीवनावर त्याचा परिणाम झाला आहे.
* हिवाळ्यात महाबळेश्वरपेक्षा कमी तापमानाचा विक्रम मुंबईच्या नावावर जमा झाला होता. आता उष्णतेच्या लाटेमध्ये मध्य महाराष्ट्र पोळून निघत असताना महाबळेश्वरही त्याला अपवाद राहिलेले नाही.
* त्याचवेळी कोकणातील बहुतांश ठिकाणी मात्र कमाल तापमान अजूनही सरासरीपेक्षा फार वाढलेले नाही. महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी रविवारी कमाल तापमान ३४.१ अंश से.
* त्याचवेळी मुंबईत सांताक्रूझ येथे ३२.८ अंश से., अलिबाग येथे ३१.४ अंश से., रत्नागिरी येथे ३१.९ अंश से. पेक्षा तापमान वाढले नाही.