मुंबई : विदर्भ, तसेच पश्चिम महराष्ट्रातील अनेक भागात पारा चाळीशीपार गेला असून उन्हाच्या तप्त झळांनी राज्य पोळत आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात मात्र तुलनेने कमाल तापमान कमी आहे. मुंबईत मंगळवारी ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मुंबईत बुधवारी कोरड्या वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईमध्ये सध्या तापमानात घट झाली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा कमी आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा मात्र कायम आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांची काहिली होत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३३.४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सध्या समुद्री वारे वेळेच्या एक – दीड तास अगोदर म्हणजेच सकाळी ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास येत आहेत. त्यामुळे किनारपट्टी भागात तापमानात घट झाली आहे.

मागील काही दिवसांपासून शहरात उष्णतेमुळे सुरू असलेली काहिली मंगळवारीही कायम होती. मागील काही दिवस मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. पुणे – नागपूरमधील तापमानाच्या तुलनेत मुंबईचे तापमान कमी असूनही घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण होत आहेत.

समुद्री वारे म्हणजे काय

समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यास ‘समुद्री वारे’ म्हणतात. दिवसा हे वारे समुद्राकडून जमिनीच्या दिशेला वाहतात. कमी दाबाच्या ठिकाणी जमिनीवरील हवा समुद्राच्या दिशेने वाहू लागते. त्यामुळे समुद्री झुळूक तयार होते. ही समुद्री झुळूक जमिनीवरील तापमान कमी करते, कारण ती थंड असते.

उष्णतेच्या लाटेचा अंदाज कायम

राज्यात यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच तापमानाने ४५ अंशाचा टप्पा पार केला आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण, तसेच दमट वातावरणाचा अंदाज आहे. चंद्रपूर येथे मंगळवारी ४५.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. याचबरोबर विदर्भातील इतर भागातही ४३ ते ४४ अंशाच्या दरम्यान तापमान होते.

उन्हाच्या चटक्याने होरपळ

राज्यातील इतर भागात उन्हाच्या चटक्याने होरपळ वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. मंगळवारीही सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे झाली. मध्य प्रदेशापासून विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे.

मंगळवारी नोंदलेले तापमान

कोकण

अलिबाग- ३३.२ अंश सेल्सिअस

रत्नागिरी- ३३.६ अंश सेल्सिअस

डहाणू- ३६ अंश सेल्सिअस

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर- ४१.६ अंश सेल्सिअस

परभणी- ४३.४ अंश सेल्सिअस

मध्य महाराष्ट्र

पुणे- ४१.२ अंश सेल्सिअस

लोहगाव- ४३.२ अंश सेल्सिअस

जळगाव- ४२.८ अंश सेल्सिअस

नाशिक-४०.५ अंश सेल्सिअस

सांगली- ४०.८ अंश सेल्सिअस

सातारा- ४०.९ अंश सेल्सिअस

सोलापूर- ४३.४ अंश सेल्सिअस