लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : विलेपार्ले येथील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील दहा मजली फेअरमोंट हॉटेलला शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच सहार पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. हॉटेल इमारतीच्या विविध मजल्यांवर अडकून पडलेल्या सुमारे ७० ते ८० जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली.
मुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाजवळील फेअरमोंट हॉटेलला शनिवारी सायंकाळी ५.२९ च्या सुमारास आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बचावकार्य हाती घेतले.
क्षणाक्षणाला आगीच्या ज्वाळा अक्राळविक्राळ रुप धारण करीत होत्या. त्याचबरोबर आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरत होते. अग्निशमन दलाच्या १५ हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. प्राथमिक स्तरावरील माहितीनुसार फेअरमोंट हॉटेल्सच्या गच्चीवरील एसी कंप्रेसर फुटल्यामुळे आग लागली आणि काही क्षणांतच हॉटेलच्या इतर परिसरात पसरली. हॉटेलच्या किचनमधून धूर आल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम पाहिले होते. या भीषण आगीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरले होते.
दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील विविध मजल्यांवर ७० ते ८० जण अडकले होते. आगीच्या ज्वाळांचे रौद्ररुप आणि दुराचे साम्राज्य यामुळे अग्निशामकांना आग विझविताना अडथळे येत होते. त्याचबरोबर विविध मजल्यांवर अडकलेल्या नागरिकांची सुटाका करण्याचे आव्हान जवानांना पेलावे लागले. प्रतिकूल परिस्थितीतही अग्निशमन दलाच्या जवानांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेल्या ७० ते ८० जणांची सुखरुप सुटका केली. सायंकाळी ६.५० च्या सुमारास आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.