टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईतल्या मरिन ड्राईव्हवर गर्दीचा महासागर लोटला होता. टीम इंडियाने जो विश्वचषक जिंकला त्यानंतर टीम इंडियाने बसमध्ये बसून सगळ्या चाहत्यांना अभिवादन केलं. विश्वविजयी टीम इंडियाला पाहण्यासाठी मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केली होती. मरिन ड्राईव्ह भागात मुंगीलाही शिरायला जागा नव्हती. याच घटनेत एका मुलीला चक्कर आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओत काय दिसतं आहे?

मरिन ड्राईव्हवर विजयी वीरांना पाहण्यासाटी प्रचंड गर्दी झाली आहे. तितक्यात एका मुलीला चक्कर येते. तिला खांद्यावर घेऊन महिला पोलीस बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी पुन्हा ढकलाढकली होते. त्यानंतर कशीबशी गर्दीतून वाट काढत या मुलीला दूर नेण्यात येतं. असं या व्हिडीओत दिसतं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे पण वाचा- विराट-रोहितचे पाय थिरकले अन् संपूर्ण टीम इंडियाने डान्स करत केलं भन्नाट सेलिब्रेशन; वानखेडेवरील व्हायरल VIDEO

मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत रॅली

गुरुवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास टीम इंडिया विश्वचषकासह दिल्लीहून मुंबईत दाखल झाली. मुंबई विमानतळावरून ते मरीन ड्राईव्हवर पोहोचले. तिथून वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी रॅली काढण्यात आली. वानखेडे स्टेडियमवर भारतीय क्रिकेटपटूंचा मोठा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी क्रिकेटपटू विजयी रॅलीमध्ये ओपन डेक बसमधून निघाले. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून आलं. या गर्दीच्या वेळी एक चाहता झाडाच्या फांदीवर चढला होता त्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

फोटो काढायला झाडावर चढला होता चाहता

क्रिकेटपटूंची विजयी रॅली जात असताना आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंचं छायाचित्र काढण्यासाठी एक चाहता थेट झाडावर चढून बसला होता. चिंतेची बाब म्हणजे हा चाहता त्या झाडाच्या एका फांदीवर अगदी टोकावर पालथा झोपून हातातल्या मोबाईलवर आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंचा फोटो काढण्यात मग्न होता. मुंबईकर रोहित शर्मानं आपल्या स्टाईलमध्ये त्या चाहत्याला झाडावरून खाली उतरायला सांगितलं. त्यापाठोपाठ इतरही क्रिकेटपटूंनी त्या चाहत्याला खाली उतरायला सांगितलं. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनीही त्यावर सोशल मीडियावर सूचक पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई पोलिसांचं आवाहन

मुंबई पोलिसांनी यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये सूचक शब्दांत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. फोटो काढण्यासाठी क्रिकेट चाहत्याने केलेल्या मेहनतीसंदर्भात “या मेहनतीचे फळ घातक ठरू शकते” असं पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. “भारतीय क्रिकेट संघाविषयी असलेले प्रेम आम्ही समजू शकतो, पण ते असे व्यक्त करणे धोक्याचे ठरू शकते”, असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.