आजपर्यंत लग्नमंडपातून वर किंवा वधू पळाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. पण लग्नमंडपातून घोडी पळाल्यानंतर काय परिस्थिती ओढावते याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वीच मुंबईत आला. पायल या चार वर्षांच्या घोडीला 23 एप्रिल रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास वरळी परिसरात नेहमीप्रमाणे लग्नासाठी आणण्यात आले होते. लग्नाच्याठिकाणी वराला या घोडीवर बसवले जाणे अपेक्षित होते. मात्र, त्याचवेळी पायलने लग्नमंडपातून पळ काढत वांद्रे-वरळी सागरी सेतू गाठला. ऐन गर्दीच्यावेळी सागरी सेतूवरील पायलच्या या प्रवासामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. सागरी सेतूवरून पळालेल्या पायलने तब्बल 413 फुटांचा प्रवास केला. एका पायाने फ्रॅक्चर असलेल्या पायलला शोधण्यासाठी तिच्या मालकाने संपूर्ण वांद्रे पालथे घातले. यादरम्यान, टोलनाक्यावरचे कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि पोलीस पायलला पाहून अवाक होत होते. लग्नमंडपातून पळालेल्या या घोडीला कसे आवरायचे, हा प्रश्न या सगळ्यांना पडला होता. या सगळ्या घटनेची खबर मुंबई पोलीसांच्या कंट्रोल रूमला लागल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पायलने संपूर्ण सागरी सेतू पार करेपर्यंत पकडायचे नाही, असा निर्णय पोलीसांनी घेतला. असे केल्यास घोडी आणखी बिथरून आजुबाजूच्या वाहनांना नुकसान पोहचावयची किंवा वाहनांना धडकण्याची शक्यता होती. कदाचित तिने घाबरून समुद्रात उडी टाकली असती तर गंभीर प्रसंग उद्भवला असता अशी माहिती येथील टोल नाक्याचे व्यवस्थापक राजेश केदार यांनी दिली. त्यानंतर सागरी सेतू पार करण्यास काही अंतर उरले असतानाच टॅक्सीतील काही इस्त्रायली पर्यटकांनी उतरून पायलला शांत केले आणि रस्त्याच्या बाजूला नेले. त्यानंतर पायलची रवानगी पालिकेच्या मालाड येथील पशुसंवर्धनगृहात करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा