गेल्या काही दिवसांपासून नवजात बाळाला फेकून देण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. मालाडमध्ये एका प्राणीप्रेमी तरुणामुळे एका नवजात बाळाचा जीव वाचला आहे. मालाड पूर्वेत २७ जानेवारी रोजी हा प्रकार घडला. फ्री प्रेसने यासंदर्भातील हे वृत्त दिलं आहे. नेमकं काय घडलं ते पाहुयात.
मालाड पूर्वेत एका उघड्या गटारात टाकलेल्या गोणीतून क्षीण आवाज येत होता. सुरुवातीला संतोष मक्वाना या प्राणी कार्यकर्त्याला वाटलं की यात कुत्र्याची पिल्ले असतील. त्यामुळे त्याने त्याच्या एनजीओच्या हेल्पलाईनवर फोन केला. कुत्र्याच्या पिल्लांना वाचवण्यासाठी त्याने काही स्वयंसेवकांना तिथे बोलावले. स्वयंसेवक तिथे पोहोचल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला. कारण, त्यात एक नवजात बाळ होतं. याप्रकरणी स्वयंसेवकांनी दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित नवजात बालकाला एमडब्ल्यू देसाई महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अवघ्या काही दिवसांचे हे बाळ गोणीत सापडले होते. या बाळाची प्रकृती चिंताजनक होती. आता या बाळाची प्रकृती सुधारली असून तिला जीविका असं नाव देण्यात आलं आहे.
प्राणी कार्यकर्त्या डॉ. नंदिनी कुलकर्णी यांनी जीविकाच्या निर्धाराचे कौतुक केले. तसंच, वेळेत उपचार पोहोचवल्याने एनजीओ आणि रुग्णालयाचेही आभार मानले. “हॅट्स ऑफ टू जीविका. प्रसारित होत असलेल्या बचाव व्हिडिओवरून हे स्पष्ट होते की ती एक नवजात आहे, तिच्या जन्मानंतर काही तासांनीच तिला सोडलेली आहे,” डॉ. नंदिनी कुलकर्णी यांनी एका इंग्रजी दैनिकाला सांगितले.