इस्टेट एजंटकडे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी एका जीआरपी पोलिसाला शिवसेनेच्या नितीन नांदगावकरांकडे धाव घ्यावी लागल्याचे समोर आले आहे. राज दुबे असं नाव असणाऱ्या इस्टेट एजंटने या पोलिसाची साडेसहा लाख रुपयांना फसवणूक केली होती, मात्र नितीन नांदगावकर यांनी या प्रकरणात लक्ष घालून त्या एजंटकडून पोलीस कर्मचाऱ्यास त्याची संपूर्ण रक्कम मिळवून दिली. या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ नितीन नांदगावकर यांनी आपल्या फेसबुकवर शेअर देखील केला आहे. शिवाय, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने नितीन नांदगावकरांचे आभारही व्यक्त केले आहेत.
विशेष म्हणजे रेल्वे पोलीस दलात कॉन्स्टेबल असणाऱ्या आनंद चव्हाण यांनी या प्रकरणी पोलिसांकडेही तक्रारही केली होती. मात्र त्यांना कुठलीही मदत मिळत नव्हती, उलट इस्टेट एजंटकडून शिवीगाळ व दमदाटी करण्यात येत होती, असा आरोपही त्यांनी केला होता. शिवाय, आपले पैसे परत मिळतील याची आशा देखील त्यांनी सोडली होती. पोलिसांकडून काही मदत होत नसल्याने अखेर त्यांनी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.
मला वाटलं नव्हतं की मला न्याय मिळेल –
पोलीसमध्ये असूनही मी काही करू शकत नव्हतो हतबल होतो. अगदी त्याने मला शिव्या देखील दिल्या आणि मी कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगू की मला त्याने शिव्या दिल्या. इथपर्यंत माझी हतबलता झाली होती आणि तसं करू शकत नव्हतो, मला वाटलं नव्हतं की मला न्याय मिळेल. परंतु खऱ्या अर्थाने न्याय कुठे मिळेल तर मला इथे मिळालेला आहे, असं मी छातीठोकपणे सांगू शकतो. अशी प्रतिक्रिया रेल्वे पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या आनंद चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
नितीन नांदगावकर, आनंद चव्हाण आणि इस्टेट एजंट यांचा झालेला संवाद –
आनंद चव्हाण यांनी नांदगावकर यांना सांगितले की, “त्याने थोडेफार पैस दिले मात्र नंतर पैसे दिलेच नाहीत. आता फोन केलातर शिवीगाळ करतोय.” यावर नांदगवाकर यांनी चव्हाण यांना तुम्ही कॉल रेकॉर्ड केला का? असा प्रश्न केला. त्यावर चव्हाण यांनी मला कॉल रेकॉर्ड करता आला नाही, असे उत्तर दिले.
पोलिसाला शिव्या द्यायची तुमची एवढी हिंमतच कशी होते? –
पुढे नांदगावकर म्हणतात, “दुबे सारखा कुणीतरी येतो आणि तुम्हाला शिव्या घालतो. तुम्ही त्याला आता फोन लावा आणि स्पीकर ऑन करा.” असं सांगून नितीन नांदगावकर त्या इस्टेट एजंटशी बोलू लागले.. “मी नितीन नांदगावकर बोलत आहे. यांनी मला सांगितलं की तुम्ही त्यांना शिव्या दिल्या.” त्यावर तो एजंट म्हणला की “मी शिवी नाही दिली तर त्यांनीच मला शिव्या दिल्या. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे.” नांदगावकर यांनी त्या एजंटला रेकॉर्डिंग पाठवण्यास सांगितले आणि म्हटले की,“ जर तुम्ही पोलिसाला शिवी देत असाल तर इतरांचं काय होणार? तुम्ही मला महिनाभराचा वेळ मागितला होता, मी तुम्हाल तुमच्या सोयीनुसार वेळ दिला होता आणि मी हे देखील सांगितलं होतं की आता तुम्हाला हे मिटवायला पाहिजे. ते जर तुम्हाला फोन करत असतील तर ते त्यांच्या पैशांसाठी फोन करताय. पोलिसाला शिव्या द्यायची तुमची एवढी हिंमतच कशी होते? तुम्ही मला ती रेकॉर्डिंग पाठवा मग मी तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही सोमवारी शिवसेना भवनात मला भेटण्यासाठी या.”
तुम्ही दोघांनी शिवसेना भवनात यायचं –
यावर नांदगावकर यांनी चव्हाण यांना सांगितलं की, “सोमवारी तुम्ही दोघांनी शिवसेना भवनात यायचं. जर त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्या असतील तर मी त्यांना इथे तर मारू शकत नाही, पण इथून त्याच्या घरापर्यंत मी त्याची कपडे काढून धिंड काढेन.”
तुम्ही माझ्यासाठी देवदूत म्हणून धावून आलात आणि न मिळणारे पैसे देखील मला मिळाले –
यानंतर पुन्हा जेव्हा चव्हाण हे नांदगावकर यांच्या भेटीला आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होत आणि हास्य होतं. चव्हाण यांनी नांदगावकरांना सांगितलं की, “जो माणूस कालपर्यंत मला शिव्या देत होता, तुमच्या एका फोनवरती त्याने मला माझे सगळे पैसे परत दिले. ज्या पैशांची मी आशा देखील सोडून दिली होती, की ते पैसे मला परत मिळतील. ते पैसे तुमच्या एका फोनवर मिळू शकतात ही माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. असं वाटतय की तुम्ही काहीतरी मोठी जादू केली. मी माझ्या पैशांची आशा तर सोडून दिलीच होती, कारण कुठेही तक्रार केली, काही केलं तरी ते पैसे मला परत मिळतील असं मला वाटत नव्हतं. परंतु तुम्ही माझ्यासाठी देवदूत म्हणून धावून आलात आणि न मिळणारे पैसे देखील मला मिळाले. मी तुमचा खूप आभारी आहे.”
…त्याला मी केवळ ठोकणार –
“माझ्या पोलीस बांधवास जो कोणी शिव्या देईल त्याला मी केवळ ठोकणार. २०१८ नंतर आता २०२२ मध्ये तुम्हाला तुमचे संपूर्ण पैसे मिळाले आहेत याचा मला आनंद आहे.” असं नितीन नांदगावकर यांनी म्हटलं.