आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. चंदा कोचर आणि दीपक कोचकर यांना सीबीआयने शुक्रवारी रात्री अटक केली. यानंतर आज त्यांना मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. सीबीआयने न्यायालयात सुनावणीदरम्यान चंदा कोचर आणि त्यांचे पती तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती दिली. न्यायालयाने त्यांना सीबीआय कोठडी सुनावली आहे.
२०१२ साली झालेल्या कर्जामधील अनियमितेबाबत सीबीआयने २०१९ साली आरोपपत्र दाखल केले होते. चंदा कोचर, व्हिडीओकॉन समूहाचे वेणुगोपाल धूत यांची नावे या आरोपपत्रात आहेत. धूत यांनी आयसीआयसीआय बँकेकडून ३२५० कोटींचं कर्ज घेतल्यानंतर नूपॉवर रिन्युएबल्स या कंपनीत गुंतवणूक केली होती. खासगी कंपन्यांना कर्जवाटप करुन बँकेची फसवणूक केल्याचं सीबीआयने आरोपपत्रात म्हटलं आहे.
२००९ मध्ये चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेचा व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना नियम डावलून तसेच पदाचा गैरवापर करत वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन उद्योगसमूहाला ३०० कोटींचे कर्ज दिले होते. ज्यानंतर धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या व्यवसायात ६४ कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले. त्यानंतर २००९ ते २०११ या काळात चंदा कोचर यांनी वेगवेगळी कारणे दाखवत १५७५ कोटी रु.चे कर्ज दिले होते. कर्ज घेताच व्हिडीओकॉन उद्योग समुहाने ३० जून २०१७ ला कंपनीचे दिवाळे निघाल्याचे जाहीर केले. सीबीआयने याप्रकरणी चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता.