वरळीसह अनेक मतदारसंघांमध्ये असाही प्रचार

विधानसभा निवडणुकीत राज्याच्या प्रश्नांप्रमाणेच मतदारसंघातील स्थानिक प्रश्न हाही प्रचाराचा मुद्दा असला तरी, मुंबईतील काही मतदारसंघांमध्ये स्थानिकत्व हा उमेदवारांच्या प्रचारातील मुख्य मुद्दा ठरू पाहात आहे. वरळी मतदारसंघातील आदित्य ठाकरे असोत की कुलाब्यातील भाई जगताप असोत, प्रत्यक्ष मतदारसंघात न राहणाऱ्या या उमेदवारांना मतदारसंघाचे प्रश्न कसे समजणार, असा प्रश्न उपस्थित करत त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मतदारांसमोर जात आहेत.

आदित्य ठाकरे यांच्यामुळे चर्चेत आलेल्या वरळी मतदारसंघापासून ते बोरिवली, दिंडोशी, वर्सोवा, कुलाबा, कांदिवली आदी मतदारसंघांत बाहेरील उमेदवार रिंगणात आहेत. काही ठिकाणी उमेदवार शेजारील मतदारसंघात वास्तव्याला आहे. यात अपक्षही मागे नाहीत.

कुलाब्यातून भाजपच्या तिकिटावर लढत असलेल्या राहुल नार्वेकर यांच्याविरोधात दंड थोपटलेले काँग्रेसचे अशोक जगताप वांद्रय़ात राहतात. नार्वेकर यांच्या कुटुंबातील तीन व्यक्ती कुलाबा मतदारसंघात नगरसेवक आहेत. त्यामुळे जगताप यांना ही लढत सोपी नाही, तर विनोद तावडे यांच्याऐवजी बोरिवलीतून उमेदवारी दिलेले भाजपचे सुनील राणे प्रभादेवीत राहतात. त्यांचे माहिम मतदारसंघातील मतदार यादीत नाव आहे. सलग दुसऱ्यांदा भाजपने या मतदारसंघातून बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिले आहे. बोरिवलीमधील पक्ष संघटनेच्या बळावर राणे निवडून येतील, असा विश्वास भाजपच्या नेतृत्वाला असल्यानेच बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिल्याची चर्चा आहे. दुसरीकडे दिंडोशीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नशीब अजमावत असलेल्या विद्या चव्हाण विलेपार्ले मतदारसंघात राहतात, तर दिंडोशीतून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात असलेले सुनील प्रभू गोरेगावमध्ये राहतात. प्रभू यांचे मतदार म्हणून नाव मात्र जोगेश्वरी मतदारसंघात आहे.

भाजपचे कांदिवली पूर्व मतदारसंघातील आमदार अतुल भातखळकर हे दुसऱ्यांदा कांदिवलीमधूनच नशीब अजमावत आहेत. मात्र तेही गोरेगावमध्ये वास्तव्याला आहेत, तर त्यांचे मतदान जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात येते. त्याचबरोबर मागाठाणे (बोरिवली पूर्व) येथील शिवसेनेचे प्रकाश सुर्वे हे बोरिवली पश्चिम येथील रहिवासी आहेत.

उमेदवारी देताना पक्ष राजकीय सोय पाहत असले तरी मतदारांवर बाहेरचे उमेदवार लादणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिक व्यक्त करतात. ‘‘बाहेरील लोकप्रतिनिधीला स्थानिक प्रश्न माहिती नसतात. स्थानिक उमेदवाराला प्रश्न समजतात आणि तो ते विधानसभेत मांडू शकतो. आदित्य ठाकरे बाहेरचे आहेत. ते निवडून आल्यावर आम्ही त्यांना शोधायला वांद्रय़ात जायचे का? त्यांच्याभोवतीच्या खासगी सुरक्षारक्षकांमुळे प्रचारादरम्यानच त्यांना भेटणे शक्य होत नव्हते. निवडून आल्यावर तरी ते कसे शक्य होणार,’’ असा प्रश्न वरळीतील रहिवाशी दत्तात्रय गव्हाणकर यांनी उपस्थित केला.

उमेदवारांना मात्र हे मान्य नाही. स्थानिकांना उमेदवारी देण्याचा मुद्दा खोडून काढताना राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण म्हणाल्या, ‘‘मी मुंबईची रहिवासी आहे. त्यामुळे या शहराचे प्रश्न मला माहीत आहेत. स्थानिक प्रश्नांची जाण असल्याने मला बाहेरचे म्हणणे योग्य नाही.’’

वरळीत सगळेच बाहेरचे

आदित्य ठाकरे वरळीतून रिंगणात आहेत. ठाकरे यांचे वास्तव्य वांद्रे येथे आहे. ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते माजी आमदार सचिन अहिर यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आलेल्या या मतदारसंघात स्थानिक उमेदवार शोधताना तारेवरची कसरत करावी लागली. बसपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या अ‍ॅड. सुरेश माने यांना तिकीट देण्यात आले. मात्र तेही शिवडी येथील रहिवासी आहेत. त्याचबरोबर वरळी मतदारसंघात ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आलेले अभिजित बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिचुकले हे मूळचे सातारचे आहेत, तर वरळीतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले नितीन गायकवाड हेही सातारा येथीलआहेत. ‘वंचित’चे गौतम गायकवाड ठाण्याचे, संभाजी ब्रिगेडचे दिनेश महाडिकठाण्याचे, बसपचे विद्यसागर विद्यागर मानखुर्दचे, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रताप हवालदार भांडुपचे, नॅशनल पीपल्स पार्टीचे मिलिंद कांबळे उल्हासनगर येथील रहिवासी आहेत.

Story img Loader