गेली दोन वर्षे आपल्या प्रेमसंबंधांबद्दल थांगपत्ताही लागू न देणारी बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री विद्या बालन आणि यूटीव्ही मोशन पिक्चर्सचे प्रमुख सिध्दार्थ रॉय कपूर शुक्रवारी चेंबूरच्या समाजमंदिरात विवाहबद्ध होत आहेत. विवाहसोहळ्याला मंगळवारपासूनच सुरुवात झाली असून बालन आणि कपूर परिवारातील सदस्य यांच्यासोबत बॉलिवूडमधील मोजक्याच सदस्यांच्या साक्षीने हा विवाहसोहळा होणार आहे. विद्या बालन आणि सिध्दार्थ रॉय कपूर यांना एकत्र परदेशवारी करताना पकडल्यानंतर त्यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र, या जोडप्याने आजपर्यंत आपल्या नात्याबद्दल प्रसिध्दीमाध्यमांकडे चकार शब्द काढला नव्हता. विद्याचा ‘द डर्टी पिक्चर’ आणि पाठोपाठ आलेला ‘कहानी’ दोन्ही चित्रपटांनी अमाप यश मिळवले. त्यामुळे बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये विद्याचे नाव सामील झाले. त्यानंतर या दोघांचा विवाह होणार, हे निश्चित झाले होते. सध्या विद्या यूटीव्हीचीच निर्मिती असलेल्या ‘घनचक्कर’ या चित्रपटात काम करते आहे.
विद्या आणि सिध्दार्थच्या विवाहाची तारीख बरीच आधी निश्चित करण्यात आली होती. या तारखा लक्षात घेऊनच ‘घनचक्कर’च्या चित्रिकरणाचे नियोजन करण्यात आले होते. हा चित्रपट संपवल्यानंतरच या विवाहसोहळ्याच्या तयारीला सुरुवात करण्यात आल्याचे सेटवरच्या सूत्ऱांकडून समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya and siddharth together