‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दरवर्षी आवर्जून हजेरी लावणाऱ्या बॉलीवूडकरांना आयोजकांनी सुखद धक्का दिला आहे. यावर्षी विद्या बालनची ‘कान’ची ज्युरी म्हणून निवड झाली आहे. प्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांच्या नेतृत्वाखालील ज्युरी समितीवर विद्या बालनसह ‘ऑस्कर’ विजेता दिग्दर्शक अँग ली, अभिनेत्री निकोल किडमन अशी नामी मंडळी आहेत.
६६ वा कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव विविध कारणांमुळे बॉलीवूडसाठी खास आहे. बॉलीवूडच्या शतसांवत्सरिक वर्षपूर्तीनिमित्त ‘कान’ महोत्सवात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, अमिताभ बच्चन यांचा पहिला हॉलीवूडपट ‘द ग्रेट गॅट्सबी’ या महोत्सवात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे यावर्षी सूनबाई ऐश्वर्या हिच्याबरोबर अमिताभ यांचीही ‘कान’ला खास उपस्थिती लाभणार आहे. विद्याबरोबरच नंदिता दासही ‘कान’च्या लघुपट विभागासाठी ज्युरी म्हणून काम पाहणार आहे. १५ मे ते २६ मे २०१३ दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात चार भारतीय चित्रपटांची निवड झाली आहे. यात अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर आणि करण जोहर यांच्या चार कथांचा समावेश असलेला ‘बॉम्बे टॉकीज’, अनुरागचा ‘अग्ली’ आणि त्याचीच सहनिर्मिती ‘डब्बा’ आणि ‘मान्सून शूटआऊट’ यांचा समावेश आहे.