लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी विहार धरण गुरुवारी मध्यरात्री ३.५० वाजेच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागले. आतापर्यंत सातपैकी तुळशी, तानसा आणि आता विहार धरण ओसंडून वाहू लागले आहे. सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून आजघडीला पाणीसाठा ६६.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा गुरुवारी पहाटे ६६. ७७ टक्क्यांवर पोहोचला. मुंबईच्या हद्दीत असलेला विहार तलाव गुरुवारी मध्यरात्री ३.५० च्या सुमारास भरून वाहून लागला. विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) एवढी आहे.
आणखी वाचा-मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, वाऱ्यांचा वेगही वाढणार
जुलै महिन्यात कोसळणाऱ्या पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठ्यांत चांगलीच वाढ झाली आहे. मुंबईकरांना पुढील २४१ दिवस म्हणजेच मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध झाला आहे. मोडक सागर धरणही ९८ टक्के भरले आहे. धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडत असून डोंगरातून झिरपणाऱ्या पाण्यामुळे धरणांमध्ये पाण्याची भर पडत आहे.
सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. त्यातुलनेत सध्या सात धरणांत ९ लाख ६६ हजार ३९५ दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. सात धरणांपैकी तुळशी, तानसा आणि विहार कठोकाठ भरले आहेत. तर सर्वात मोठे भातसा धरण ६४ टक्के भरले आहे.
मोडक सागरही भरून वाहू लागला
मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ७ पैकी एक मोडक-सागर धरणही गुरुवारी सकाळी १०.४० च्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागले आहे. मुंबईकरांची तहान भागविणारे सातपैकी चौथे मोडक सागर धरण भरून वाहू लागले आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ही १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक महत्त्वाचे मोडकसागर धरण ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर आहे. या धरणातून दरदिवशी ४५५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो.
कोणत्या धरणात किती पाणीसाठा
उर्ध्व वैतरणा – ३४.१३ टक्के
मोडक सागर – ९८.६६ टक्के
तानसा – ९९.१८ टक्के
मध्य वैतरणा – ६३.३२ टक्के
भातसा – ६४.०९ टक्के
विहार – १०० टक्के
तुळशी – १०० टक्के