विजया मेहता यांचे आत्मचरित्र ‘झिम्मा’ प्रकाशित
लेखन हे आमच्यासारख्या नाटकवाल्यांचे काम नाही. लेखनासाठी एकांताची गरज असते आणि आम्ही मंडळी सदैव ‘गँग’मध्ये वावरणारी. त्यामुळे गेली दोन वर्षे चाललेल्या या लेखन प्रवासात मी मला माझी नव्याने उलगडले, असे हितगुज ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांनी त्यांचे शिष्य, चाहते यांच्या उपस्थितीत बोलताना केले.
मराठी रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला आणि विजयाबाईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी झालेल्या ‘झिम्मा’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. पुस्तक लिहिताना चार मित्र गवसले. त्यापैकी एक जुना मित्र म्हणजे गौतम राजाध्यक्ष. त्याने एका नाटय़ कार्यशाळेदरम्यान काढलेला फोटो पुस्तकाच्या मुखपृष्ठावर वापरलाय. मुखपृष्ठ सजविणारा सुभाष अवचट हा दुसरा मित्र आणि  माजगावकर आणि अंबरीश मिश्र असे आणखी दोघे असे चार मित्र गवसले, असेही विजया मेहता यांनी आवर्जून सांगितले.
माटुंग्याच्या यशवंत नाटय़मंदिरात झालेल्या या सोहळ्यासाठी विजयाबाईंचे अनेक शिष्य, गानसरस्वती किशोरी आमोणकर, अभिनेता अनुपम खेर यांसारखे चाहते यांच्यासह अनेक रसिकप्रेक्षकही उपस्थित होते. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘झिम्मा’ या आत्मचरित्राचा प्रवास राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांनी योग्य शब्दांत उलगडला. दोन वर्षांपूर्वी याच सभागृहात किशोरी आमोणकर यांच्या ‘स्वरार्थमणी’ या संगीतविषयक ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात आपण विजयाबाईंना आत्मचरित्र लिहिण्याबाबत विचारणा केली होती. त्यावर त्यांनी, हातातले काम पूर्ण झाले की लगेचच आत्मचरित्र लिहू असे कबूल केले होते.
या आत्मचरित्र लेखनात विजयाबाईंना मोलाची साथ करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अंबरीश मिश्र यांनीही गेल्या दीड वर्षांतील विजयाबाईंसोबत घालवलेल्या क्षणांना उजाळा दिला. बाईंचे आत्मचरित्र वाचणे हे एका शांत निळ्याशार सरोवरात रंगीबेरंगी होडय़ांमधून विहार करण्याचा अनुभव घेण्यासारखे आहे, असे अंबरीश मिश्र यांनी सांगितले.

Story img Loader