मुंबई : प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांचे शिक्षण आणि जातीय संस्थेवर भाष्य करणाऱ्या ‘पाहिजे जातीचे’ या नाटकावर आधारित चित्रपट त्याच नावाने प्रेक्षकांसमोर येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘वाचायला शिका, विचार करायला शिका आणि महत्त्वाचे म्हणजे प्रश्न विचारायला शिका’ हे विचारसूत्र घेऊन तेंडुलकरांनी हे नाटक लिहिले होते. या नाटकावर आधारित चित्रपटात अभिनेते सयाजी शिंदे मुख्य भूमिकेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पाहिजे जातीचे’ हे तेंडुलकर यांचे नाटक १९७२ आणि १९७५ च्या काळात गाजले होते. हे नाटक चित्रपटरुपात मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या नाटकाच्या तालमी मी पाहिल्या होत्या. नाटकाचे जेव्हा चित्रपटात रुपांतर होते, तेव्हा त्याच लेखकाने तो चित्रपट लिहिला तर तो संदेश योग्यरीत्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो. विषय मांडण्यामागची तळमळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. मात्र जेव्हा नवीन लेखक तो विषय हाताळतो तेव्हा त्याचे विचार आणि मूळ लेखकाचे विचार जुळणे फार गरजेचे असते, असे अभिनेते सायजी शिंदे यांनी या चित्रपटाची झलक प्रकाशनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सांगितले.

हेही वाचा – मुंबईवर पुन्हा २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी; पंतप्रधान मोदी व योगी आदित्यनाथ यांचंही घेतलं नाव!

‘पाहिजे जातीचे’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्याबरोबर संजना काळे, विक्रम गजरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा ही एका लहान गावातील महिपती या होतकरू आणि महत्त्वाकांक्षी तरुणाभोवती फिरते. शिक्षक होऊ पाहत असलेल्या या तरुणाची जातीय भेदभावामुळे झालेली फरफट या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक कब्बडी नरेंद्र बाबू यांनी दिग्दर्शित केला आहे. तर डॉ. मल्लिकार्जुन एन. गजरे यांची निर्मिती असलेला हा चित्रपट ४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा – गोरखपूर एक्स्प्रेस बिघाड : मध्य रेल्वे २०-२५ मिनिटे, तर पश्चिम रेल्वे १०-१५ मिनिटे उशिराने

‘पाहिजे जातीचे’ हा सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर भाष्य करणारा चित्रपट आहे. आजही जातीपातीच्या विळख्यात अडकून समाजातील अनेक होतकरू मुलांचे आयुष्य धुळीला मिळते आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. गुणवत्तेच्या आधारे मुलांच्या प्रगतीचे मोजमाप झाले पाहिजे, या गोष्टीची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे, असे या चित्रपटाचे निर्माते डॉ. मल्लिकार्जुन एन. गजरे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay tendulkar pahije jatiche is now in movie form mumbai print news ssb