मुंबई : दोन आठवडय़ांच्या प्रतीक्षेनंतर काँग्रेसने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची शिफारस केली आहे. पक्षाने घोषणा केल्यावर काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करण्यात आला. शुक्रवारी अधिवेशन संपत असल्याने तोपर्यंत वडेट्टीवार यांच्या नावाची अधिकृतपणे अध्यक्षांकडून विधानसभेत घोषणा होते का, याची उत्सुकता असेल.
विरोधी पक्षनेतेपदी वडेट्टिवार यांचे नाव निश्चित करण्यात आले असले तरी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेतेपद मात्र बाळासाहेब थोरात यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांना त्या संदर्भातही पत्र देण्यात आले आहे. वडेट्टीवार हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे समर्थक ओळखले जातात. वडेट्टीवार यांचे नाव निश्चित करून काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने अशोक चव्हाण यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी बाळासाहेब थोरात इच्छूक होते.
आधी मंत्रिपद व नंतर विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चा होऊनही हाती काहीच न पडलेले व नाराज असलेले संग्राम थोपटे यांची वर्णी लागेल, अशी चर्चा होती. अजित पवार यांच्या बंडानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. ४५ आमदार असलेल्या काँग्रेसचा या पदावर दावा केला होता. राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाने त्याला पाठिंबा दर्शविला होता.
दुसऱ्यांदा विरोधीनेतेपद
विजय व़ेट्टीवार यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद दुसऱ्यांदा आले आहे. २०१४ ते १०१९ या कालावधीत काँग्रेसने राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर विरोधी नेतेपदाची जबाबदारी सोपविली होती. परंतु २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर विखे पाटील यांनी पुत्र सुजय यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी विरोधी पक्षनेतेपदी वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. परंतु त्यांना चार-पाच महिन्यांचाच कालावधी मिळाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्र मागे
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करावी, असे २ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षांना दिलेले पत्र मागे घेण्यात येत आहे, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी दुसरे पत्र अध्यक्षांना दिले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला.
नाना पटोले यांचे भवितव्य काय ?
विदर्भातील तसेच ओबीसी समाजातील विजय वडेट्टीवार यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी निश्चित करण्यात आल्याने विदर्भातीलच नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद कायम राहण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसमध्ये शक्यतो मराठा व ओबीसी असे जातीचे समीकरण साधले जाते. ओबीसी समाजातील वडेट्टीवार विरोधी पक्षनेते होणार असल्याने प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.