राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर अजित पवार गटातील नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाविषयी एक विधान केलं. यात त्यांनी ब्राम्हण समाजात संभाजी आणि शिवाजी नाव ठेवत नाहीत, असं म्हटलं. यानंतर आता यावर काँग्रेस नेते आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. वडेट्टीवारांनी भुजबळांच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला. तसेच शब्द फिरवला नाही, तर ते खरे भुजबळ असं म्हणत टोलाही लगावला. ते रविवारी (२० ऑगस्ट) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “छगन भुजबळ म्हणाले ते खरं आहे, ती वस्तूस्थिती आहे. भुजबळ तिथे राहून वस्तूस्थिती बोलत असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करतो. आम्ही छगन भुजबळांकडे बहुजनांचे नेते म्हणून बघत होतो. ते या वाक्यावर ठाम राहिले, डगमगले नाहीत, वक्तव्य मागे घेतलं नाही, शब्द फिरवला नाही तर ते खरे भुजबळ.”
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते?
छगन भुजबळ म्हणाले होते, “काही लोक म्हणतात, तुम्ही इकडे-तिकडे गेलात. पण, कुठेही गेलो तरी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सोडणार नाही.”
“मुद्दाम संभाजी भिडे नाव ठेवण्यात आलं”
“संभाजी भिडे यांचं खरं नाव मनोहर कुलकर्णी असून, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. खरेतर ब्राम्हण समाजाने वाईट वाटून घेऊन नये. पण, ब्राम्हण समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत. मात्र, मुद्दामहून संभाजी भिडे हे नाव ठेवण्यात आलं,” अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.
“…तर तुम्ही समाजासाठी पाहिजे ते करू शकता”
“इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभे राहावे लागेल. कारण, जोपर्यंत आपला इतिहास माहिती होणार नाही, तोपर्यंत आपण भविष्याकडे बघू शकत नाही. राज्यक्रांतीकारकापासून समाजक्रांतीकारपर्यंत हा आपला वारसा आहे. महात्मा फुलेंनी सांगितलंय, ‘सत्तेविना सर्व कळा झाल्या अवकळा.’ सत्ता असेल, तर तुम्ही समाजासाठी पाहिजे ते करू शकता,” असेही छगन भुजबळ यांनी सांगितलं.
चंद्रपूरमध्ये उपचाराअभावी परिचारिकेचा मृत्यू झाला. त्यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “राज्यातील आरोग्य विभागातील २६ टक्के पदं रिक्त आहेत. यात तज्ज्ञ, वैद्यकीय महाविद्यालयासाठीचा शिक्षक वर्ग यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांचा प्रचंड अभाव आहे. कनिष्ठ डॉक्टरांचाही तुटवडा आहे. मला दुःख हे वाटतं की, चंद्रपूरमध्ये एक नर्स त्या रुग्णालयात राहते. ११ वाजेपर्यंत एकही डॉक्टर त्या रुग्णालयात येत नाही. ती महिला तडफडून मरते. एका परिचारिकेवर अशी वेळ येत असेल, तर इतर रुग्णांची स्थिती काय असेल.”
हेही वाचा : “ब्राम्हण समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत”, छगन भुजबळ यांचं वक्तव्य
“परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यू होत असेल, तर आयुष्मान भारत, जागतिक रुग्णालये उभ्या करण्याच्या घोषणा केल्या जातात. लोकांचा जीव वाचवला जाणार नसेल, तर त्याचं काय करायचं. राज्यातील आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत,” असं मत वडेट्टीवारांनी व्यक्त केलं.