नंदुरबार येथील सहाजणांकडून आपण कर्ज घेतल्याचा दावा बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी खुली चौकशी सुरू असलेले माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी केला आहे. प्राप्तिकर खात्याच्या चौकशीदरम्यान गावित यांनी हा दावा केला.
  तर दुसरीकडे गावित यांची याप्रकरणी खुली चौकशी पूर्ण करण्यास न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
विजयकुमार गावित आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेची सुरू असलेली खुली चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळेस दिले होते.
विष्णू मुसळे यांनी अ‍ॅड्. उदय वारूंजीकर यांच्यामार्फत केलेल्या याचिकेवर न्या.अभय ओक आणि न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळेस प्राप्तिकर खाते आणि एसीबीतर्फे चौकशीचा प्रगती अहवाल सादर करण्यात आला. प्राप्तिकर खात्याच्या अहवात गावित यांचा जबाब नोंदविण्यात आल्याचा आणि त्यात त्यांनी नंदुरबार येथील सहाजणांकडून कर्ज घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याची कागदपत्रे सादर करण्याचे गावित यांना सांगण्यात आल्याचे व अन्य गावित कुटुंबियांनी मात्र जबाब नोंदविण्यासाठी वेळ मागितल्याचेही प्राप्तिकर खात्याने  म्हटले आहे.
दुसरीकडे, एसीबीने खुल्या चौकशीबाबत सादर करत चौकशी पूर्ण करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. वर्षनिहाय उत्पन्नाची चौकशी केली जात असल्याने त्याला वेळ लागणार आहे, असा दावा एसीबीने केला. न्यायालयानेही एसीबीने चौकशीच्या प्रगती अहवालाबाबत समाधान व्यक्त करत चौकशी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ केली.
अशा प्रकरणांचा तपास घाईने केल्यास त्यात गंभीर चुका केला जाण्याची शक्यता असल्याचे लक्षात घेऊन एसीबीला ही मुदतवाढ दिली जात असल्याचेही न्यायालयाने प्रामुख्याने नमूद केले.

Story img Loader