विक्रोळीच्या ‘विकास रात्र महाविद्यालया’ला ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’च्या ‘नॅक’ या मूल्यांकन परिषदेतर्फे मानाची ‘अ’ श्रेणी प्रदान करण्यात आली आहे. ‘अ’ श्रेणीकरिता नॅकने विकास महाविद्यालयाला दिलेले गुण मुंबई विद्यापीठाच्या गुणांपेक्षाही जास्त आहेत.
‘नॅक’ची (राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद) ‘अ’ श्रेणी मिळविणारे हे मुंबईतीलच नव्हे तर देशातील पहिले रात्र महाविद्यालय ठरले आहे. कारण रात्र महाविद्यालयांना फारतर ‘ब’ श्रेणीपर्यंत मजल मारता आली आहे. पण, अभ्यासक्रमाचे स्वरूप, अध्ययनाची साधने, विद्यार्थ्यांना सर्वागीण प्रगतीकरिता दिले जाणारे मार्गदर्शन, महाविद्यालयाचे व्यवस्थापन व नेतृत्व आणि महाविद्यालयात राबविले जाणारे नावीन्यपूर्ण उपक्रम यामुळे या विकास महाविद्यालयाला नॅकची ‘अ’ ही सर्वोत्तम श्रेणी प्राप्त करण्यात यश आले आहे. या श्रेणीमुळे विकास महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्नित केसी, एचआर, एसआयईएससारख्या महाविद्यालयांच्या पंक्तीत जाऊन बसले आहे.
विक्रोळीतील कामगार वर्ग तसेच आर्थिक व सामाजिकदृष्टय़ा मागास समाजाच्या गरजा ओळखून ‘विद्या विकास एज्युकेशन सोसायटी’ने १९८६ साली हे महाविद्यालय सुरू केले. कला, विज्ञान आणि वाणिज्य या तिन्ही शाखा या महाविद्यालयात आहेत. महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर असे १३ अभ्यासक्रम चालविले जातात. महाविद्यालयात सध्या तीन हजार विद्यार्थी दिवसा काम करून सायंकाळी आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत.
‘शिक्षण क्षेत्रात स्पर्धात्मक स्तरावर बदल होत आहेत. या बदलांना सामोरे जाण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी आवश्यक गुणात्मक दर्जा प्राप्त केला पाहिजे, यावर आमचा गाढा विश्वास आहे. म्हणूनच नॅकच्या आधीच्या पाहणी अहवालात सुचविलेल्या सूचनांवर आम्ही मेहनत घेतली़ शिक्षकांना संशोधनासाठी प्रवृत्त करणे, पायाभूत सुविधा उंचावणे आदी प्रयत्नांतून महाविद्यालयाला या उंचीवर आणले,’ असे विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संचालक  प. म. राऊत यांनी सांगितले.
आतापर्यंत विकास महाविद्यालयाकडे बी-प्लस ही श्रेणी होती. नॅकच्या पाहणीत ३ ते चारमध्ये गुण मिळविणाऱ्या महाविद्यालयांन अ श्रेणी बहाल केली जाते. पण, गुणात्मक दर्जा उंचावण्यात यश आल्याने यंदा नॅकने विकास महाविद्यालयाला ३.१५ गुण बहाल केले आहेत.
हे गुण मुंबई विद्यापीठापेक्षाही (३.०५) जास्त आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा