मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने मालमत्तेवर टाच आणल्यानंतर प्रथमच मुंबईत आलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी शक्तिप्रदर्शन करत भाजपवर हल्ला चढवला. आयएनएस विक्रांतच्या आणि राष्ट्रभक्तीच्या नावावर कोटय़वधी रुपये गोळा करून पीएमसी बँकेच्या माध्यमातून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ते पैसे स्वत:कडे वळवले, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी केला. राज्यसभेत त्यांच्याच पक्षाचे खासदार यावर बोलू शकलेले नाहीत असे सांगत देशभरात किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात गुन्हे केले जातील असा, इशारा राऊत यांनी दिला.

संजय राऊत यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाल्यावर शिवसैनिकांनी शक्तिप्रदर्शन करत घोषणाबाजी केली. हे शक्तिप्रदर्शन नाही तर चीड आणि संताप आहे. आयएनएस विक्रांतच्या नावाने पैसा गोळा करून त्याचा घोटाळा झाला आहे. खुद्द राजभवननेच पैसे जमा झाले नसल्याची माहिती दिली आहे. त्याविरोधात आज शिवसैनिकांनी आंदोलन केले. हे शक्तिप्रदर्शन नाही तर लोकांच्या भावना आहेत. भाजपाचे लोक आयएनएस विक्रांत घोटाळा करणाऱ्या किरीट सोमय्यांच्या बाजूने उभे आहेत. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. मी पुराव्यासह भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. राज्यसभेत हा विषय निघाल्यावर त्यांच्याच पक्षाचे खासदार यावर बोलू शकलेले नाहीत. कारण त्यांनाही माहिती आहे की घोटाळा झाला आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल आज गावपातळीवर चीड आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ला करत आहे, असे संजय राऊत म्हणाले. तुम्ही आमचे काय करणार? केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप आमच्यावर हल्ले करत आहे. ते फारतर आम्हाला तुरुंगात पाठवतील. माझी तयारी आहे. आम्हाला ठार मारतील, आमची तयारी आहे. पण २५ वर्षे तुमचे सरकार महाराष्ट्रात येणार नाही याची तजवीज तुम्हीच करून ठेवली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सगळय़ांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हीही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. ठिणगी पडली आहे. यापुढे जसजशी त्यांची पावले पडतील, तशी आमची पावले पडतील असे राऊत म्हणाले. दरम्यान, गजा मारणे या कुप्रसिद्ध गुंडाचीही अशीच मिरवणूक निघाली होती, अशी खोचक प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनावर दिली.