राज्य काँग्रेसमधील गटातटाच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या समर्थकांची पावले कोठे वळतील, याबाबत पक्षात कुजबूज सुरू असतानाच गेल्या काही दिवसांतील घडामोडींवरून विलासरावांचे समर्थक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हळूहळू जवळ जात असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे.
आमदार जयप्रकाश छाजेड हे विलासराव देशमुख यांचे एकदम जवळचे मानले जात. छाजेड यांना विधान परिषदेची आमदारकी मिळवून देण्यासाठी विलासरावांनी सारी प्रतिष्ठा पणाला लावली होती. चारच दिवसांपूर्वी छाजेड यांच्या पुढाकाराने नाशिकमध्ये झालेल्या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. छाजेड यांनी अशोकरावांना निमंत्रित करणे हेच सूचक असल्याचे पक्षाच्या वर्तुळात मानले जात आहे. विलासरावांच्या प्रयत्नांमुळे मूळचे कोल्हापूर जिल्ह्य़ातील जयवंतराव आवळे हे गेल्या वेळी लातूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. मुंबई-लातूर ही रेल्वेगाडी नांदेडपर्यंत विस्तारित करण्याकरिता खासदार आवळे यांनी अनुकूल असे पत्र दिले होते. ही गाडी नांदेडचे खासदार भास्करराव खतगावकर-पाटील यांच्या पुढाकाराने नांदेडपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. लातूरची गाडी नांदेडपर्यंत विस्तारित करण्यास लातूरच्या खासदाराने पत्र दिलेच कसे, असा प्रश्न लातूरमधील विलासरावांच्या समर्थकांनाही पडला आहे. मराठवाडय़ातील विलासरावांना मानणारे छोटे-मोठे कार्यकर्तेही अशोक चव्हाण यांच्या जवळ जाऊ लागल्याचे सांगण्यात येते. शेवटी विलासराव हे अशोकरावांचे गुरुबंधू होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसमधील एका नेत्याने व्यक्त केली. अर्थात, विलासरावांचे सारेच समर्थक अशोकरावांच्याजवळ गेलेले नाहीत.
‘आदर्श’ घोटाळ्यात अशोक चव्हाण हे अडकल्याने काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्यापासून चार हात दूर राहात होते. पण या घोटाळ्यातून ते बाहेर पडतील असे चित्र निर्माण झाल्याने अशोक चव्हाण यांना पक्षाकडून कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची निमंत्रणे येऊ लागली आहेत.
अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमांना विलासरावांचे समर्थक उपस्थित राहू लागल्याने वेगळा अर्थ काढण्यात अर्थ नाही, असा दावा औरंगाबादमधील एका कार्यकर्त्यांने केला. पक्षाच्या कार्यक्रमाला अशोकराव प्रमुख पाहुणे उपस्थित होते, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पुढील निवडणुकीत उमेदवारीसाठी कोण मदत करणार हे विलासरावांच्या समर्थकांपुढे मोठे प्रश्नचिन्ह आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा स्वभाव लक्षात घेता ते मदत करतीलच अशी शक्यता नाही. नारायण राणे यांचा एक पर्याय विलासराव समर्थकांसमोर असला तरी दोघांमध्ये अशोक चव्हाण हे त्यांना अधिक जवळचे वाटतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vilasrao deshmukh supporter joing the camp of ashok chavan