राज्य काँग्रेसमध्ये विलासराव देशमुख यांना मानणारा नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग असला तरी त्यांच्या निधनाच्या वर्षभरानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नेमकी कोणती भूमिका घ्यायची याबद्दल संभ्रम अद्यापही कायम आहे. मराठवाडय़ातील काही कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नेतृत्त्व स्वीकारले असले तरी बडय़ा नेत्यांनी अन्य गटात सहभागी होण्याचे अद्याप तरी टाळले आहे.
राज्य मंत्रिमंडळातील बाळासाहेब थोरात आणि हर्षवर्धन पाटील हे विलासरावांचे डावे-उजवे हात मानले जात. या दोन्ही मंत्र्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. पाटील यांची पाश्र्वभूमी लक्षात घेता ते कोणत्याही गटात सहभागी होऊ शकतात, असे काँग्रेसमध्ये बोलले जाते. थोरात यांनी मुख्यमंत्र्यांशी जुळवून घेतले आहे. विलासरावांचे कट्टर समर्थक उल्हास पवार यांना पुन्हा आमदारकीची संधी मिळू शकली नाही. दुसरे समर्थक आमदार जयप्रकाश छाजेड यांनी त्यांच्या नाशिक मतदारसंघात अशोक चव्हाण यांना कार्यक्रमाला बोलावून सूचक संदेश दिला. विलासरावांचे कट्टर समर्थक पुढील निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळवून देण्यासाठी कोण मदत करू शकेल याचा अंदाज बांधत आहेत. विलासरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या गटाचे नेतृत्व ठराविक नेत्याकडे गेलेले नाही.   नांदेड विरुद्ध लातूर वादात विलासराव  आणि  चव्हाण यांचे बिनसले होते. विलासरावांच्या निधनानंतर मात्र त्यांच्या समर्थकांना चुचकारण्यावर अशोकरावांनी भर दिला. विलासराव हे आपले गुरुबंधू होते याची आठवण अशोकराव आवर्जून काढत आहेत.

Story img Loader