पोलिसांचा पेहराव करून फिरणाऱ्या तोतया पोलिसाला पकडण्यात विलेपार्ले पोलिसांना पोलिसांना यश आले आहे. आरोपी कमांडोप्रमाणे टोपी, बूट व दुचाकीवर पोलिसांचे चिन्ह लावून हा तोतया फिरत होता. त्याच्याविरोधात तोतयागिरी केल्याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनीच गुन्हा दाखल केला आहे.
विलेपार्ले पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले यांनी हनुमान मंदिराजवळून मंगळवारी एका संशयीत तरूणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीवर पोलिसांचे चिन्ह लावले होते. तसेच या तरूणाने पोलीस कमांडोप्रमाणे टोपी आणि बूट घातले होते. भोसले यांनी संशय आल्यामुळे या तरूणाला ताब्यात घेतले आणि विलेपार्ले पोलीस ठाण्यात नेले.
हेही वाचा >>>“मुख्यमंत्र्यांनी नगरविकासासाठी सर्वाधिक निधी दिला, पण…”; विकास आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत फडणवीस नेमकं काय म्हणाले?
आपले नाव पवन दीपक मिश्रा असून मिरा-भाईंदर येथील विजय नगर परिसरात वास्तव्याला असल्याचे त्याने पोलिसांना चौकशीत सांगितले. पोलिसांसारखे बूट व टोपी का घातली याबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊन लागला. त्यामुळे या तरुणाविरोधात भादंवि कलम ४१९, १७० अंतर्गत तोतयागिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा >>>मुंबईतल्या व्यावसायिकाच्या पत्नीची अभिनेता साहिल खान विरोधात लैंगिक छळाची तक्रार
दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी गेल्या आठवड्यात एका ४५ वर्षीय व्यक्तीला सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या गणवेशात फिरताना अटक केली होती. एमआयडीसी परिसरातील एलिग्टंन बिझनेस पार्क परिसरात एक व्यक्ती पोलिसांचा गणवेश घालून फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात गस्त घालून, खबरीने दिलेल्या माहितीच्या आधारे कैलास जनार्दन खामकर (४५) याला पकडले होते.