काश्मीरमधील बांदिपूर जिल्ह्य़ातील आटवाटू येथे उभे राहणार
‘सरहद’ संस्था आणि राज्य शासनाच्या पर्यटन विभागाचा उपक्रम
साहित्य, कला, संस्कृतीचा पाच हजारांहून अधिक वर्षांचा वारसा लाभलेल्या जम्मू-काश्मीरमधील बांदिपूर जिल्ह्य़ातील आटवाटू या गावात ‘पुस्तकांचे गाव’ उभे राहणार आहे. ‘सरहद’ संस्था आणि जम्मू-काश्मीर राज्य शासनाचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा आगळा प्रकल्प आकाराला येणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात याबाबत राज्य शासनाच्या संबधित विभागांकडे याचे सादरीकरण होणार असून त्यानंतर एक ते दोन महिन्यांत हे गाव उभे राहणार आहे.
‘सरहद’ संस्था गेली अनेक वर्षे काश्मीरमध्ये काम करत असून संस्थेने मुख्यमंत्री मुफ्ती मोहमंद सैद यांच्याकडे याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. जम्मू-काश्मीर राज्याचे शिक्षणमंत्री नईम अख्तर, बांदिपूरचे जिल्हाधिकारी आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांसमवेत ‘पुस्तकांच्या गावा’बाबत चर्चा, बैठक झाली. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला असून आता जम्मू-काश्मीरच्या मंत्रिमंडळापुढे हा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती ‘सरहद्द’ संस्थेचे संजय नहार यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्रात पुस्तकांचे गाव उभारण्याची घोषणा केली होती. त्यावरून काश्मीरमध्ये पुस्तकांचे गाव प्रत्यक्षात आणण्याची कल्पना सुचली. बांदिपूर जिल्ह्य़ातील आटवाटू या गावात हे पुस्तकांचे गाव उभे राहील, असे सांगून नहार म्हणाले, ऋषीमुनींपासून, वाग्भट, अभिनव गुप्त, क्षेमेंद्र ते काश्मिरी पंडितांपर्यंत एक मोठी ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक परंपरा काश्मीरला आहे. त्या परंपरेचे या निमित्ताने पुनरुज्जीवन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक, शिक्षण व ग्रामविकास मंत्रालयाचेही सहकार्य या उपक्रमास लाभले आहे.
काश्मिरी भाषेच्या विकासासाठी  विशेष प्रयत्न
आटवाटू हे गाव श्रीनगरपासून ७५ किलोमीटर अंतरावर असून येथे पहिल्या टप्प्यात देशभरातून येणाऱ्या लेखकांची निवास व्यवस्था, लेखनासाठी सर्व सुविधा तेथे असतील. भव्य आणि सुसज्ज असे ग्रंथालय तेथे उभारणार असून त्यात मराठीसह हिंदी, गुजराथी, इंग्रजी, उर्दू आदी भाषेतील विविध विषयांवरील पुस्तके, मासिके येथे उपलब्ध असतील. काश्मिरी भाषेच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. नोबेल, बुकर, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांना येथे आणून चर्चा, परिसंवाद आदी साहित्यविषयक उपक्रमही येथे आयोजित केले जाणार आहेत. आटवाटू गावातील बारा मुले सध्या पुण्यात शिक्षणासाठी राहात असून त्याची जबाबदारी ‘सरहद’संस्थेने घेतली आहे. यातील दोन मुलांना आम्ही या उपक्रमात समन्वयक म्हणून सहभागी करून घेणार असल्याचेही नहार यांनी सांगितले.

Story img Loader