‘गणरंग’ ही नाटय़संस्था आणि ‘अॅडीक्ट’ या जाहिरात संस्थेच्या माध्यमातूनही त्यांनी मराठी रंगभूमी व जाहिरात क्षेत्रात ठसा उमटविला होता. दूरदर्शनवरील ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’ ही मालिका त्या वेळी खूप गाजली होती. त्याचे तसेच ‘झी मराठी’वरील ‘आभाळमाया’ या गाजलेल्या मालिकेचे दिग्दर्शनआपटे यांचे होते. दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्यावरील हिंदी मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शनही आपटे यांचे होते. दूरदर्शनने अचानक त्यांची ही मालिका बंद केली होती. त्यानंतर विविध स्तरातून प्रयत्न झाल्यानंतर ही मालिका पुन्हा सुरू झाली होती. मात्र मालिकेमुळे त्यांना मनस्ताप झाला होता. त्या सगळ्यातून बाहेर पडून त्यांनी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली होती. काही इंग्रजी नाटकातूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या. प्र. ल. मयेकर यांच्या ‘सवाल अंधाराचा’ या नाटकावरील आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन ते करणार होते. अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेचे उपाध्यक्ष, मराठी व्यावसायिक नाटय़निर्माता संघाचे अध्यक्ष या नात्यानेही त्यांनी काम केले होते. ‘उन्मेष’, ‘आयएनटी’ आदी एकांकि का स्पर्धेतून अभिनेता, दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले होते. दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावरील निर्माता म्हणूनही त्यांची कारकिर्द गाजली होती. ‘कुसुम मनोहर लेले’ या गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन आपटे यांनी केले होते. या नाटकात संजय मोने आणि डॉ. गिरीश ओक यांच्या भूमिकांची अदलबदल करून प्रयोग सादर करण्याची कल्पनाही आपटे यांचीच होती. मच्छिंद्र कांबळी यांची निर्मिती असलेल्या ‘करायचे ते दणक्यात’या चित्रपटाचे दिग्दर्शन आपटे यांनी केले होते.
तरूण कलाकारांची पिढी  घडवली – रिमा लागू
एक कालखंड आम्ही एकत्र घालवला आहे. आमची सुरूवात एकत्र झाली होती टीव्हीपासून. त्याने टीव्हीसाठी म्हणून काही नाटकांचे दिग्दर्शन केले होते. त्यातल्या काही नाटकांमध्ये आम्ही एकत्र कामही केलेले आहे. तो माझा शेजारीही होता. हे काय चालले आहे हे कळत नाही. आमचेच मित्र आम्हला सोडून चालले आहेत. अजून सुधीर भटांच्या धक्क्यांतून आम्ही सावरलेलोही नव्हतो तेवढय़ात विनयच्या जाण्याने फार मोठा धक्का दिला आहे. विनयचा आवाज हा आरपार भिडणारा होता. त्याचा आवाड आणि त्याचे थेट बोलणे, नजरेला नजर भिडवून बोलणे ही त्यांची खासियत होती. पण, या ताकदीने अभिनय करतानाही तो सहजसुंदर असायचा. नाटकाच्या इतर अंगाविषयीही त्यांना चांगली जाण होती. पण, याहीपेक्षा सुनील बर्वे, सचिन खेडेकर, सुकन्या कुलकर्णी अशा कलाकारांची एक पिढीच्या पिढी त्याने घडवली हे त्यांचे सगळ्यात मोठे योगदान होते. या मुलांचे कौतूक कर गं.. आपल्याशिवाय त्यांचे कौतूक कोण करणार?, इतक्या पोटतिडकीने तो हे सगळे करत होता.
 ऋण  कसे फेडणार? – सुकन्या कुलकर्णी-मोने
विनय आपटे यांच्यामुळे तर मी घडले. माझे पहिले नाटक ‘जन्मगाठ’ हे त्यांच्यामुळे घडले. ‘आभाळमाया’सारख्या मालिकांमध्ये आम्ही एकत्र काम केले. अगदी आता ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतही तो माझा भाऊ झाला होता. मला हक्काने ओरडणारा, माझ्यावर नितांत प्रेम करणारा असा विनय आम्हाला सोडून गेला आहे. त्याचे ऋण मी कसे फेडणार? त्याने मला इतके  भरभरून दिले आहे .
विनयला मी ‘नाटय़गृह’च म्हणत होते – वंदना गुप्ते
सगळ्यात जवळची अशी माझी दोन माणसे लागोपाठ गेली. विनय हा माझा रूईयापासूनचा मित्र होता. त्याला तर मी ‘नाटय़गृह’च म्हणायचे. कारण, मराठी नाटय़ आणि चित्रपटसृष्टीत आघाडीवर कार्यरत असणारी आजची पूर्ण पिढी ही विनयने घडवलेली आहे. केवढे मोठे काम होते त्याचे. विनय हा आमचा मित्र होता, सहकलाकारा होता, निर्माता होता, दिग्दर्शक होता. सतत अतिशय हिरीरीने पुढे जाणारा, नेहमी प्रखरपणे आपली भूमिका मांडणारा, त्याची मते ही नेहमी तीव्र असायची. त्याने नेतेपण हे कधी सोडलेच नाही. नाटय़परिषदेच्या बाबतीत म्हणशील तर आम्ही अध्यक्ष म्हणून त्याचे नाव सुचवले होते. दुर्दैवाने, आमचे पॅनेल निवडून न आल्याने तो अध्यक्ष होऊ शकला नाही.
अध्यक्षाच्या त्या खुर्चीचा तोल आणि मान सांभाळून त्याला नाटकासाठी जे करायचे होते ते तो करू शकला नाही. पण, बाहेरून नाटकासाठी जे जे काही करता येईल ते ते तो सतत करत राहिला. माझ्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे नाटक त्याने दिग्दर्शित केले होते. एकप्रकारे माझ्या आयुष्यातील मैलाचा दगड म्हणता येईल असा क्षण त्याच्यामुळेच तर मिळाला. स्वच्छ वाणी आणि स्वच्छ विचार असणारा हा आमचा मित्र आम्हाला सोडून गेला आहे.
ते माझे  गुरू होते- श्रीरंग गोडबोले
आपटे यांच्यामुळेच मला ‘आयएनटी’च्या एकांकिका स्पर्धेत काम करण्याची संधी मिळाली. रुईया महाविद्यालयात मी प्रवेश घेतला होता. ‘आयएनटी’च्या एकांकिका स्पर्धेसाठी ऑडिशन सुरू होत्या. मी तेथे गेलो आणि आपटे यांना एक उतारा वाचून दाखविला. माझे वाचन ऐकून त्यांनी माझी नाटकासाठी निवड केली. त्यानंतर पुढे त्यांच्याबरोबर खूप काम केले. माझे ते गुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा