मराठा समाजाला आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक या मागण्यांबाबत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने झुलवत ठेवून निर्णय न घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे शुक्रवारी महायुतीमध्ये सामील झाले. भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता आल्यावर मेटे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. मात्र सर्व समाजघटकांमधील आर्थिक दुर्बलांना आरक्षण द्यावे, या आपल्या जुन्या भूमिकेवर शिवसेना ठाम असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मेटेंच्या समावेशामुळे महायुतीला आता सहावा भिडू मिळाला आहे.
सत्ताधारी आघाडीकडून भ्रमनिरास झाल्याने महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे मेटे यांनी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मेटे महायुतीला येऊन मिळाल्याने मराठवाडय़ासह अनेक मतदारसंघात मराठा समाजाची मते मिळविण्यास यश येईल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना वाटत आहे. मेटे गेले काही दिवस महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात होते. गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे यांच्याशी त्यांची चर्चाही झाली होती. मराठा आरक्षणाच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा मिळेल का, या मुद्दय़ावरून मेटेंच्या महायुतीतील प्रवेशाचे गाडे अडले होते. भाजप नेत्यांनी ठाकरे यांच्याशी चर्चा केली व मेटेही ठाकरे यांना भेटले. त्यानंतर शिवसेनेने मेटे यांच्या महायुतीतील समावेशाला हिरवा कंदील दाखविला व घाईघाईने त्यांच्या महायुतीतील प्रवेशाची घोषणा करण्यात आली.
सहावा पांडव!
महायुतीत मनसेने यावे यासाठी काही भाजप नेत्यांनी प्रयत्न सुरू करताच, ती वेळ आता गेलेली आहे आणि महायुतीत आणखी कुणालाही सहभागी करून घेणार नाही, असे उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या गोटातून स्पष्ट करण्यात आले होते. पाच पक्षात सहावा येऊ नये यासाठी घाईघाईत इचलकरंजीत सभा घेऊन आता आम्ही पाच पांडव आहोत आणि सहाव्याची गरज नाही, अशी गर्जनाही केली गेली होती. त्या गर्जनेबाबतचे स्पष्टीकरण मात्र ठाकरे आणि मुंडे यांनी केलेले नाही.
मराठवाडय़ात आघाडीच्या मराठा मतांवर परिणाम?
शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याने मराठवाडय़ात सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मराठा समाजाच्या मतांवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. धनगर समाजाचे महादेव जानकर, मराठा समाजाचे नेते मेटे यांना बरोबर घेत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा मेटे यांनी सातत्याने लावून धरला होता. मराठा समाजात मेटे यांचा तेवढा प्रभाव नसला तरी आरक्षणाचा त्यांनी हाती घेतलेला मुद्दा त्यांना राजकीयदृष्टय़ा फायदेशीर ठरू शकतो. राष्ट्रवादी किंवा पवार यांचे वर्चस्व असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात फारसा फरक पडला नाही तरी मराठवाडय़ात काही प्रमाणात मराठा मतांमध्ये फरक पडू शकतो. मराठा आरक्षणाची मागणी ही पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाडय़ात जास्त आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता मराठा आरक्षण आघाडी सरकारने लागू केले नाही ही बाब राष्ट्रवादीसाठी मराठवाडय़ात त्रासदायक ठरू शकतो.
काँग्रेस आघाडी सरकारने मराठा आरक्षण लागू केले नाही याची प्रतिक्रिया मराठवाडय़ात उमटू शकते हे लक्षात घेता मुंडे यांनी मेटे यांना गळाला लावले. मेटे यांच्यासारख्या जहाल मराठा नेत्याला महायुतीने बरोबर घेतल्याने शिवसेनेच्या इतर मागासवर्गीय मतपेढीवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण इतर मागासवर्गीय समाजात मेटे यांच्याबद्दल नाराजीची भावना आहे.
राष्ट्रवादीच्या वतीने विधान परिषदेवर निवडून गेलेल्या मेटे यांच्या आमदारकीची मुदत २०१६ पर्यंत आहे. महायुतीला दिवस चांगले येण्याची शक्यता गृहीत धरूनच मेटे यांची पावले तेथे वळली असावीत, असे राष्ट्रवादीत बोलले जाते. छगन भुजबळ यांच्यामुळे राष्ट्रवादीचे नुकसान झाले, असे विधान केल्याबद्दल राष्ट्रवादीने मेटे यांना नोटीस बजाविली होती. राष्ट्रवादीचे नेते आता मेटे यांच्या विरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे.
मेटे महायुतीत
मराठा समाजाला आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक या मागण्यांबाबत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने झुलवत ठेवून निर्णय न घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे शुक्रवारी महायुतीमध्ये सामील झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-03-2014 at 12:36 IST
TOPICSमहायुतीMahayutiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionविनायक मेटेVinayak Mete
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinayak mete in mahayuti