मुंबई : रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार नारायण राणे यांच्या निवडीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच, राणे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट आणि बेकायदेशीर पद्धतींचा अवलंब केल्याचा आरोप केला आहे.
राणे यांनी फसवणुकीने ही निवडणूक जिंकल्यानेच त्यांची खासदारकी रद्द करण्याची आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी नव्याने किंवा फेरनिवडणूक घेण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्याची मागणी राऊत यांनी याचिकेद्वारे केली आहे. तसेच, याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत राणे यांना खासदार म्हणून काम करण्यापासून प्रतिबंध करावा, असे आदेश देण्याची मागणीही राऊत यांनी केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ७ मे रोजी निवडणूक झाली आणि ४ जून रोजी निकाल जाहीर झाला. राणे यांना ४ लाख ४८ हजार ५१४ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. त्यांनी, राऊत यांचा ४७ हजार ८५८ मतांच्या फरकाने पराभव केला होता.
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, मतदानाच्या ४८ तास आधी प्रचाराला पूर्णविराम दिला जातो. तथापि, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ६ मे रोजीही राणे यांचे कार्यकर्ते-समर्थक प्रचार करताना आढळून आल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. तसेच, ही कृती वैधानिक तरतुदीचे उल्लंघन असल्याचाही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.आपण या प्रकरणी १६ मे रोजी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. तसेच, राणे यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना धमकावणे आणि लाच देण्यासारख्या भ्रष्ट पद्धतीचा अवलंब करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे सांगितले होते. मात्र, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे, न्यायालयात धाव घेतल्याचे राऊत यांनी याचिकेत म्हटले आहे. राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनीही १३ एप्रिल रोजी जाहीर सभेत मतदारांना धमकावल्याचा आरोपही राऊत यांनी याचिकेत केला आहे.
चित्रफितीची स्वतंत्र समितीद्वारे चौकशीची मागणी
राणे यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी करताना राऊत यांनी समाजमाध्यमावरून प्रसिद्ध झालेल्या एका चित्रफितीचा दाखला याचिकेत दिला आहे. या चित्रफितीत राणे यांचे कार्यकर्ते मतदारांना मतदान यंत्र दाखवून आणि पैसे वाटून राणे यांना मतदान करण्यास सांगत आहेत. या चित्रफितीच्या चौकशीसाठीही स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.