राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येणारा २०१४ वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रा. द. मा. मिरासदार यांना तर श्री. पु. भागवत पुरस्कार केशव भिकाजी ढवळे प्रकाशन यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी केली. पाच लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. तीन लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे श्री. पु. भागवत पुरस्काराचे स्वरुप आहे.
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या दोन्ही पुरस्कारार्थींची निवड केली. मराठी भाषा गौरवदिनी म्हणजेच येत्या २७ फेब्रुवारी रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. याप्रसंगी २०१४ साठीचे राज्य वाड्‍मय पुरस्कार तसेच मराठी भाषा विभागाच्या सर्व कार्यालयांनी प्रकाशित केलेल्या ई-पुस्तकांचे प्रकाशन व ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास २०१० या वर्षापासून विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येत असून, २०१४ या वर्षासाठी मिरासदार यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील कादंबरी, विनोदी कथा, वगनाटय, चित्रपट संवाद, विविध विषयांवर लेख इत्यादी सर्व साहित्य प्रकार प्रा. मिरासदार यांनी लीलया हाताळले आहे. पाच राज्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्काराने त्यांना यापूर्वी गौरविण्यात आले आहे. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक विजया राजाध्यक्ष, श्री. के. ज. पुरोहित, श्री. ना. धों. महानोर, वसंत आबाजी डहाके यांना गौरविण्यात आले आहे.
मराठी साहित्य निर्मिती क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट प्रकाशन संस्थेस २००८ पासून श्री. पु. भागवत पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असून, २०१४ या वर्षासाठी केशव भिकाजी ढवळे प्रकाशन संस्थेची निवड करण्यात आली आहे. वैविध्यपूर्ण व सकस वाड्मय निर्मितीसाठी ही संस्था ओळखली जात असून गेल्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत संस्थेने वाचकांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.