मराठी भाषेचा प्रसार, प्रचारासाठी भरीव योगदान दिल्याबद्दल मराठी भाषा विभागातर्फे  दिला जाणारा प्रतिष्ठेचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्री. पू. भागवत पुरस्कारासाठी शब्दालय प्रकाशन आणि मराठी भाषा अभ्यासक पुरस्कारासाठी डॉ. सुधीर रसाळ यांची निवड करण्यात आली आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार संजय जनार्दन भगत आणि मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश यांना देण्यात येत असल्याची घोषणा मराठी भाषा विभाग व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी केली.

येत्या २७ फेब्रुवारीला मराठी भाषादिनी रवींद्र नाटय़मंदिर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मान्यवरांना प्रदान करण्यात येतील, असेही देसाई यांनी सांगितले.

पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारा’चे स्वरूप आहे. रंगनाथ पठारे यांनी विपुल साहित्यलेखनासोबतच मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी भरीव योगदान दिले आहे. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या अभिजात मराठी भाषा समिती व अभिजात मराठी भाषा मसुदा उपसमितीचे अध्यक्ष, साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतिमंडळाचे सदस्य, वाङ्मय पुरस्कार निवड समित्यांचे अध्यक्ष व सदस्य पदही त्यांनी भूषविलेले आहे.

श्री. पु. भागवत पुरस्कार अहमदनगर जिल्ह्य़ातील श्रीरामपूर येथील शब्दालय प्रकाशन संस्थेला जाहीर झाला आहे. तीन लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या प्रकाशन संस्थेद्वारे महाराष्ट्र आणि गोव्यात मिळून अनेक पुस्तक प्रदर्शने भरविली आहेत. तसेच ही संस्था दरवर्षी ‘शब्दालय’ हा दिवाळी अंक प्रकाशित करते.

मराठी भाषा अभ्यासक पुरस्कारासाठी औरंगाबादचे डॉ. सुधीर रसाळ यांची निवड झाली असून पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. डॉ. रसाळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले असून गेली ६० वर्षे ते मराठी भाषा, मराठी वाङ्मय आणि मराठी संस्कृती या क्षेत्रांत लेखन करीत आहेत.

कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार संजय जनार्दन भगत व मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश यांना घोषित करण्यात आला आहे. दोन लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. भगत यांनी भाषा संचालनालयाने तयार केलेला परिभाषा कोश सामान्य जनतेपर्यंत प्रथम संगणक माध्यमातून पोहोचविण्याचे कार्य केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinda karandikar lifetime achievement award to senior literary ranganath pathare abn
Show comments