ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची बोरीवली परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या हत्येचे राज्य स्तरावर पडसाद उमटले असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळत आहे. घोसाळकर यांची हत्या मॉरिस नरोन्हानं केली की आणखी कुणी? असा संशय उद्धव ठाकरेंनी उपस्थित केल्यानंतर या प्रकरणातलं गूढ वाढलं आहे. या पार्श्वभूमीवर अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी सविस्तर निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
उद्धव ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकर यांचं हे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आलं आहे. या निवेदनात विनोद घोसाळकर यांनी विश्वासानं इतकी वर्षं जनतेची सेवा केल्याचं नमूद केलं आहे. “१९८२ पासून मी सक्रिय राजकारणात आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्राचे तंतोतंत पालन करत आहे. मी आणि माझा पुत्र अभिषेक आम्ही निरपेक्षपणे आणि निष्ठेने राजकारण आणि समाजकारण केले आहे. शिवरायांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. निष्कलंकपणे आम्ही सामाजिक जीवनात वावरत आहोत. कोणताही डाग आमच्यावर नाही”, असं घोसाळकरांनी निवेदनात म्हटलं आहे.
“आम्ही कधीही विश्वासाला तडा जाऊ दिला नाही”
“मी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलो. नंतर विधानसभेवर निवडून गेलो. मुलगा अभिषेक, सून तेजस्वी हेसुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आले. जनतेचे प्रेम आणि विश्वास आम्हाला मिळाला. त्याला आम्ही कधीही तडा जाऊ दिला नाही. जनतेची आम्ही नि:स्वार्थपणे सेवा केली”, असं घोसाळकर यांनी नमूद केलं आहे.
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; मारेकऱ्याच्या अंगरक्षकाला अटक
“आमचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र”
“माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने झालेली हत्या हा आमच्यावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य असे बिनबुडाचे आरोप करून आमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार सुरू आहे. ही बदनामी कृपा करून तत्काळ थांबवा, अशी माझी कळकळीची विनंती आहे”, असं आवाहन विनोद घोसाळकर यांनी केलं आहे.
“आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार नोंदवा. पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे”, असा इशाराच विनोद घोसाळकर यांनी दिला आहे.