भाजपच्या मंत्र्यांवर विविध आरोप करीत काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असताना राष्ट्रवादीने मौन बाळगल्याबद्दल चर्चा सुरू झाली होती, पण विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राष्ट्रवादीने भाजपच्या मंत्र्यांना लक्ष्य केले. विनोद तावडे यांच्या शिक्षणाचा नवा मुद्दा उपस्थित करीत मुख्यमंत्र्यांना हटविण्याच्या भाजप अंतर्गतच कारवाया सुरू झाल्याचा आरोप गुरुवारी करण्यात आला.
पंकजा मुंडे, विनोद तावडे, बबनराव लोणीकर या मंत्र्यांवर आरोप होत असताना राष्ट्रवादीने कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. पक्षाच्या नेत्यांची चौकशी सुरू असल्याने राष्ट्रवादीने नमते घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, सरकारवर टीकेची एवढी संधी चालून आली असताना गप्प बसणे योग्य ठरणार नाही, असा पक्षात मतप्रवाह होता. पक्षाने आक्रमक भूमिका घेतली पाहिजे, असा युक्तिवाद जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. यातूनच बहुधा पंकजा मुंडे आणि विनोद तावडे या दोन आरोप झालेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.
तावडेंवर गंभीर आरोप
विनोद तावडे यांनी दहावीच्या परीक्षेला डमी उमेदवार बसविला होता व तेव्हा तावडे यांच्या वतीने उत्तरपत्रिका लिहिणारा तो आता आपल्या संपर्कात असल्याचा आरोप मलिक यांनी केला. बारावीची परीक्षाही तावडे उत्तीर्ण झालेले नाहीत.
ज्ञानेश्वर विद्यापीठातून बारावी अनुत्तीर्णानाही अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जात होता. आपण उच्च व तंत्रशिक्षणमंत्री असताना ज्ञानेश्वर विद्यापीठाचा हे सारे प्रकरण आले होते, असेही मलिक यांनी सांगितले. तावडे यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल एवढा वाद होऊनही सोशल मिडियामध्ये त्यांनी अभियांत्रिकी पदवी असल्याचा उल्लेख कायम ठेवला आहे. तावडे हे स्वत:च उत्तीर्ण नसल्याने त्यांना परीक्षांमधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पुळका असल्याचा आरोप मलिक यांनी केला.
अंतर्गत हालचाली
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनीच गृह खात्याच्या कारभाराबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हटविण्याकरिता भाजप अंतर्गत हालचाली सुरू झाल्याचा दावा मलिक यांनी केला. नवी मुंबई, औरंगाबाद व वसई-विरार, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा सपाटून पराभव झाल्याने मतदारांमध्ये भाजपबद्दल नाराजी निर्माण झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे मलिक यांनी सांगितले.
तावडे यांचे मलिक यांना आव्हान
दहावीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवून उत्तीर्ण झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी सिद्ध केल्यास मी राजकारण सोडेन, पण हा आरोप सिद्ध न करू शकल्यास मलिक यांनी राजकारण सोडावे, असे आव्हान शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. मी डमी म्हणून ज्याला बसविला होता तो आज ४५ वर्षांंचा असल्याचे मलिक यांनी सांगितले. आपले वय ५३ असून, मलिक यांनी दावा केलेली व्यक्ती ४५ वर्षांंची असल्यास ती तेव्हा इयत्ता दुसरीत असावी, असे सांगत मलिक यांचे सारे आरोप फेटाळून लावले.