महसूल खाते स्वीकारण्याची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची तयारी नसल्याने ते खाते सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील यांच्याकडे असलेल्या सहकार व सार्वजनिक बांधकाम या खात्यांपैकी एखादे खाते अन्य मंत्र्यांकडे सोपवले जाण्याची चिन्हे आहेत. तावडे यांच्याकडे विधान परिषदेतील सभागृह नेतेपद दिले जाईल आणि सर्वात ज्येष्ठ असलेल्या मुनगंटीवार यांच्याकडे मंत्रिमंडळातील दुसरे स्थान दिले जाईल.
मुनगंटीवार, पाटील आणि तावडे या मंत्रिमंडळातील तीनही ज्येष्ठ सदस्यांना यथोचित सन्मान देऊन त्यांची कोणतीही नाराजी निर्माण होऊ न देण्याची दक्षता मुख्यमंत्री फडणवीस घेणार असल्याचे समजते.
महसूल खाते स्वीकारण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली मात्र महसूल खाते स्वीकारण्यास मुनगंटीवार तयार नाहीत त्यामुळे हे खाते चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविले जाण्याची चिन्हे आहेत. त्यांच्याकडच्या सहकार आणि सार्वजनिक बांधकाम यापैकी एक खाते अन्य मंत्र्यांकडे सोपविले जाईल. मुनगंटीवार यांनी कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास, पर्यटन अशी अतिरिक्त खाती स्वीकारण्याची तयारी दाखविल्याचे समजते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे मंत्रिमंडळात येण्यास उत्सुक असले तरी सध्याच्या परिस्थितीत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याची भाजपची तयारी नाही. बागडे यांना मंत्रिमंडळात घेतल्यावर अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यास शिवसेनेकडून भाजपला दणका दिला जाऊ शकतो. शिवसेनेने विरोधात मतदान केले किंवा तटस्थ भूमिका घेतली, तर भाजपची पंचाईत होऊ शकते. त्यामुळे बागडे यांची वर्णी लागणे कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले.