कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूरमधील मराठी भाषिक, वृद्ध, महिला व युवती यांना बेदम मारहाण केलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सोमवारी केंद्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. के. जी. बालकृष्णन यांच्याकडे केली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारची दडपशाही सुरुच असून, रविवारी येळ्ळूर गावातील मराठी भाषिकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. पोलिसांनी घराघरांवर तुफानी दगडफेक केली. खिडक्या, गाड्यांच्या काचांचा चक्काचूर केला, त्यांना अडविणाऱ्या मराठी भाषिकांना बेदम मारहाण केली. लहान मुले, वृद्ध, महिला आणि गर्भवतींवरही लाठीहल्ला केला. पोलिसांच्या या अमानुष वागणुकीमुळे महाराष्ट्रात संतापची लाट उसळली आहे. सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसविणाऱ्या कर्नाटक पोलिसांच्या या कृत्याची तातडीने चौकशी करण्याची आग्रही मागणी तावडे यांनी न्या. के. जी. बालकृष्णन यांना पाठविलेल्या पत्रात केली.
कर्नाटक पोलिसांनी ज्या पद्धतीने मराठी भाषिकांवर अत्याचार केला, त्यामुळे मानवी हक्कांची पायमल्ली झाली आहे. हा अमानुष प्रकार करताना कर्नाटक पोलिसांनी सर्व कायदे आणि नियम पायदळी तुडविले आहेत. झालेला प्रकार अन्यायकारक असून, पोलिसांच्या लाठीमारीत जखमी झालेले मराठी भाषिक, महिला आणि वृद्ध सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे तावडे यांनी मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा