राज्यातील जनता दुष्काळात होरपळत असताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे उन्हाळी सुट्टीसाठी लंडनवारीवर गेले असल्याची चर्चा भाजपमध्ये रंगली आहे. तावडे मंगळवारी पहाटेपर्यंत मुंबईत पोचत असून भाजपच्या राज्य परिषदेत होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीवरील आणि भीषण पाणीटंचाईवरील चर्चेत मात्र सहभागी होणार आहेत.
आंबा प्रक्रिया प्रकल्प उद्घाटनाचा कार्यक्रम माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत देवगड येथे गेल्या आठवडय़ात झाला. त्यावेळी तावडे उपस्थित होते. त्यानंतर ३० एप्रिलला ते लंडनला रवाना झाले. आपली लंडनवारी गुप्त ठेवण्याच्या सूचना तावडे यांनी सर्व संबंधितांना दिल्या होत्या. त्यामुळे ते देवगडला गेले असल्याचे सर्वाना सांगितले जात होते. पण विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या आत्महत्येनंतर बहुतांश भाजप नेते उपस्थित असताना तावडे यांची अनुपस्थिती कटाक्षाने दिसून आली. तेव्हा ते लंडनला गेल्याची बाब उघड झाली.
ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे दुष्काळी भागाचा दौरा करीत आहेत आणि ते उपोषणालाही बसले होते. मात्र विधिमंडळात राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत कंठशोष करुन झाल्यावर राज्यातील भाजपची धुरा वाहणाऱ्यांपैकी एक महत्वाचे नेते मात्र लंडनला सुट्टीसाठी गेले आहेत, याची खमंग चर्चा पक्षातील नेत्यांमध्ये आहे.
भाजपची राज्य परिषद मंगळवारी षण्मुखानंद सभागृहात होत आहे. त्याच्या तयारीसाठी पक्षाचे सरचिटणीस व महत्वाच्या नेत्यांच्या बैठका होत आहेत. फडणवीस यांनी कोअर ग्रुपचीही बैठक घेतली. खडसे यांच्या घरी दुर्दैवी घटना झाली असल्याने ते हजर नसताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेही गैरहजर असल्याने ही बाब पक्ष कार्यकर्त्यांना खटकत आहे.
कडक उन्हाळ्यामुळे लंडनला जाऊन थंड होवून आल्यावर पक्ष कार्यकर्त्यांपुढे भाषण करणे, म्हणजे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान..’ या उक्तीप्रमाणे ठरणार आहे.
नितीन गडकरी केंद्रीय अध्यक्ष असताना महत्वाच्या राजकीय प्रसंगी पक्षाचे नेतृत्व करण्याऐवजी एका नातेवाईकाच्या घरी मुंजीचे निमित्त करून काही दिवस परदेशात होते. तोच प्रकार पुन्हा तावडे यांच्याकडूनही झाला असल्याचे कार्यकर्त्यांना वाटत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी गदारोळ केला, या पाश्र्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांचे हे वर्तन कितपत उचित ठरु शकते, याचीही चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, याप्रकरणी विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
नेत्यांचा राजकीय ‘विनोद’लंडनवारीनंतर तावडे यांची दुष्काळचर्चा !
राज्यातील जनता दुष्काळात होरपळत असताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे उन्हाळी सुट्टीसाठी लंडनवारीवर गेले असल्याची चर्चा भाजपमध्ये रंगली आहे. तावडे मंगळवारी पहाटेपर्यंत मुंबईत पोचत असून भाजपच्या राज्य परिषदेत होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीवरील आणि भीषण पाणीटंचाईवरील चर्चेत मात्र सहभागी होणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-05-2013 at 04:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod tawde discuss on drought after landon visit