मुंबई : तंबाखूमुक्त मोहिमेत सक्रिय पाठिंबा देणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना नुकतेच ‘नरोत्तम सेखसारिया फाऊं डेशन’ व ‘सलाम बॉम्बे फाऊं डेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सर्वोत्तम सहाय्यक राजकीय नेता’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तावडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात तंबाखूमुक्त शाळा मोहिमेचा प्रचार वेगाने करण्यात आला. त्यांच्या प्रयत्नांमुळे यवतमाळ, वर्धा व नंदुरबार हे तीन जिल्हे तंबाखूमुक्त झाले. नरोत्तम सेखसारिया फाऊं डेशन व सलाम बॉम्बे फाऊं डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘चौथ्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन टोबॅको ऑर हेल्थ’ या कार्यक्रमामध्ये तावडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तावडे यांच्या कार्यकाळात त्यांनी तंबाखूमुक्त शाळांसाठी प्रयत्न केले. त्यामुळे २०२२ पर्यंत महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्याच्या सलाम बॉम्बेच्या ध्येयाला बळ मिळाले आहे. तंबाखूमुक्त पिढी हवी असेल तर तणावमुक्त शिक्षणाच्या माध्यमातून तणावमुक्त पिढी तयार करावी लागेल, असे आवाहन तावडे यांनी केले.
देशातील सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी व तंबाखूमुक्त देश निर्माण करण्याच्या आपल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ‘नरोत्तम सेखसारिया फाऊं डेशन’ तर्फे १० लाख रुपयांचे अनुदान देऊ न या कार्याचा गौरव केला जातो. या वर्षी उत्तर प्रदेशची ‘तरुण चेतना’, मध्य प्रदेशातील ‘दीनदयाळ इन्स्टिटय़ूट’, महाराष्ट्रातील ‘निर्माण विकास’ आणि बिहारच्या ‘दिशा एक प्रवास’ या संस्थांचाही गौरव या वेळी करण्यात आला. या निमित्ताने तावडे यांच्या हस्ते तंबाखू नियंत्रणासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल या चार संस्थांच्या प्रतिनिधींना ते अनुदान देण्यात आले.