Vinod Tawde Reaction On Money Distribution Alligations : उद्याच्या मतदानाकडे सगळ्यांचं लक्ष असताना विरारमध्ये खळबळजनक घडामोडी घडताना दिसत आहेत. विरारच्या विवांत हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. तसेच विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, या आरोपांवर आता विनोद तावडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनोद तावडे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. मी निवडणुकीसंदर्भातील काही गोष्टी सांगण्यासाठी तिथे पोहोचलो होतो. त्यावेळी बविआचे कार्यकर्ते तिथे आले, त्यांचा असा गैरसमज झाला की, मी पैसे वाटतो आहे. पण याप्रकरणी आता निवडणूक आयोग आणि पोलीस तपास करत आहेत. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेजही आहे. मी गेली ४० वर्ष राजकारणात आहे. जे सत्य आहे, ते समोर आहे. माझीसुद्धा मागणी आहे की याप्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, असं विनोद तावडे म्हणाले.

हेही वाचा – VIDEO : विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप, बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरले, विरारमध्ये तणाव

नेमकं काय घडलं विरारमध्ये?

विरार पूर्वच्या मनोरीपाडा परिसरातील विवांता हॉटेलमध्ये आज सकाळी अचानक खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या हॉटेलमध्ये आले होते. भाजपाच्या या मतदारसंघातील उमेदवाराची भेट घेण्यासाठी विनोद तावडे या हॉटेलमध्ये आल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्याचवेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते क्षितिज ठाकूर यांच्यासमवेत हॉटेलमध्ये आले. या कार्यकर्त्यांकडून विनोद तावडेंकडून पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, कुणाला कसे पैसे वाटप झाले, याची माहिती असणारी डायरीही सापडल्याचा दावा करण्यात येत आहे.

हेही वाचा – Video: “मला भाजपावाल्यांनीच विनोद तावडेंबद्दल सांगितलं”, हितेंद्र ठाकूर यांची माध्यमांना माहिती; पैसे वाटल्याचा आरोप!

“भाजपावाल्यांनी सांगितलं तावडे पैसे घेऊन येत आहेत”

दरम्यान, “मला भाजपावाल्यांनी सांगितलं होतं की विनोद तावडे ५ कोटी रुपये घेऊन येतायत. मला वाटलं राष्ट्रीय नेते एवढं लहान काम करणार नाही. पण इथे पाहिलं तर पैसे वाटप चालू आहे, कार्यकर्तेही आहेत. या डायऱ्यांमध्ये नोंदी दिसत आहेत”, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod tawde reaction on money distribution alligations virar vivanta hotel hitendra thakur spb